Published on
:
18 Nov 2024, 6:08 am
Updated on
:
18 Nov 2024, 6:08 am
पालघर/बोईसर : महाराष्ट्रातील मुलींनाच नव्हे तर महाविकास आघाडीला राज्याची सत्ता दिल्यास या राज्यात जन्मलेल्या मुलांनाही मोफत शिक्षण देण्याची ग्वाही ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पालघरमधून जाहीर सभेत दिली. पालघरमध्ये महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाचे बोईसर उमेदवार डॉ. विश्वास वळवी व पालघर उमेदवार जयेंद्र दुबळा यांच्या प्रचारार्थ ते बोईसरच्या खैरेपाडा मैदानावर आले होते.
गुजरातच्या बंदरावर ड्रग्सचा साठा नेहमीच सापडत असतो. पालघरमध्ये वाढवण बंदर आल्यास येथेही ड्रग्स येतील आणि इथली तरुण पिढी व त्यांचे कुटुंब यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार आहेत. या बंदरामुळे फक्त पालघर जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण किनारपट्टीला धोका आहे. त्यामुळे आमची सत्ता आल्यास वाढवण बंदरासह मुरबे बंदर रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना सांगितले.
हे युती सरकार आदिवासी कोळीचे अस्तित्व संपवायला निघाले आहे. त्यांचे अस्तित्व संपवून अदानीला अस्तित्व तयार करायला द्यायचे असा घाट या सरकारने घातला आहे. हे मी कदापि होऊ देणार नाही. मी विकासाच्या विरुद्ध नसून मी विनाशाच्या विरुद्ध आहे. पालघर हा सुंदर जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये वाढवण, मुरबे बंदर आणण्यापेक्षा येथील निसर्ग समृद्ध वारसांचे जतन करून पर्यटन स्थळ, जव्हार सारख्या ठिकाणी हिल स्टेशन तर विमानतळ असा विकास मला करायचा आहे. त्यामुळे येथे उद्योजक पर्यटक येतील व येथील परिसराचा विकास होईल, अशी आशा ठाकरे यांनी व्यक्त केली. येथील शिक्षण, आरोग्याच्या सुविधा दर्जेदार करायचे असून तरुणांना रोजगार द्यायचा आहे, येथील नागरिकांचे जीवनमान सुकर करणार आहे. त्यासाठी तुम्हाला पालघर व बोईसर येथील उमेदवार निवडून द्यायचे आहे. त्यानंतर हे उमेदवार सांगतील ते करायला माझी तयारी आहे असे ठाकरे यांनी येथे आश्वासन दिले.
विधानसभांच्या निवडणुकांसाठी पालघरमध्ये गुजरातची लोकं काय करतात. येथील रिसॉर्टमध्ये राहतात, खुले आम फिरतात असा आरोप उद्धव ठाकरे यांनी येथे केला. माझ्या दहा-पंधरा वेळा बंगा तपासलेल्या आहेत. गुजरातची जी मंडळी येथे येत आहेत ते शेष ढोकळा घेऊन येतात का असा घनाघात करून त्यांच्या बॅगा तपासल्या का, ते कुठे सभा घेत आहेत हे तपासण्याचा प्रयत्न यंत्रणांनी केला का, यंत्रणा म्हणत असेल की तक्रार आली नाही. तर माझी बॅग तपासण्याची तक्रार आली होती का असा प्रश्र उद्धव ठाकरे यांनी निवडणूक यंत्रणासमोर उपस्थित केला आहे.
लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना १५०० रुपये दिले म्हणजे घर चालते का सवाल उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर उपस्थित केला. महिलांना केवळ पंधराशे देऊन चालत नाही. तर त्यांना मान, सन्मान, सुरक्षा यासह दरमहा तीन हजार रुपये देणार असल्याचे हमी मविआ सरकार आल्यानंतर आज देत आहे असे ठाकरे यांनी सांगितले, राज्यातील आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांचे मानधन आमचे सरकार आल्यास वाढवू, राज्यातील कुटुंबांना २५ लाखापर्यंतची कॅशलेस मोफत आरोग्यसेवा आमचे सरकार देईल, असे वचन उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर दिले. यावेळी महाविकास आघाडी मधील उमेदवार जयेंद्र दुबळा, डॉ विश्वास वळवी यासह घटक पक्षाचे प्रमुख प्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते सभेमध्ये उपस्थित होते.
मोदींच्या बॅगेत केवळ थापा
मोदींच्या बंगा तपासण्यात काहीच अर्थ नाही कारण त्यांच्या भागात केवळ थापा आढळतील गरज नाही कारण त्यांच्या या थापा त्यांच्या भाषणातून दिसून येतात दिशाभूल करणारे हे सरकार आहेत असेही आरोप ठाकरे यांनी केले आहेत.
गद्दारांचे सरकार गचके खाणार
गद्दार यांच्या ठाणे जिल्ह्यात गेल्यानंतर तिथे गचके खात जावे लागले असे रस्त्यांच्या खड्ड्यांवर उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित करून हे गद्दारांचे सरकार २३ तारखेला गचके खाणार असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.
वनगाला त्यांनी वापरून फेकले
पालघरमध्ये चिंतामण वनगा यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांचा मान- आदर राखत आम्ही त्यांना आपलेसे केले होते. श्रीनिवास वनगांना निवडून दिले त्यानंतर तो शिंदे गटात गेला, मात्र शिदे गटाने त्यांना वापरले व वापरून फेकून दिले वापरा व फेका ही त्यांची प्रवृत्ती आहे आमची नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी बोईसर मधून शिंदे शिवसेनेवर लगावला आहे
तर वाढवणचा वरवंटा तुमच्या डोक्यावर फिरवतील
वाढवण नको हवे असेल तर मशालला मतदान करा नाहीतर वाढवणचा वरवंटा तुमच्या डोक्यावरून फिरवल्याशिवाय हे विनाशकारी सरकार बसणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी बोईसरच्या सभेत वाढवन वासियांना संबोधताना सांगितले.