महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान पार पडले. यंदा 65 टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. गेल्यावेळेच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ही वाढलेली टक्केवारी कुणाच्या फायद्याची ठरेल हे 23 नोव्हेंबरला मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होईल. मात्र तत्पूर्वी अनेक एक्झिट पोल समोर येत आहेत. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून महाविकास आघाडीला सत्तास्थापनेएवढं बहुमत मिळेल, असा ठाम विश्वासही व्यक्त केला.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लोकशाहीमध्ये मतदान गुप्त असते. लोक मनातली गोष्ट मांडतात असे नाही. महाराष्ट्रातही यावेळी असेच झाले आहे. त्यामुळे 2-4 हजारांचा सर्व्हे करून कोण जिंकणार, कोण हरणार हे कसे सांगतात. हरयाणामध्येही काँग्रेस 60 जागा जिंकेल असा एक्झिट पोल आलेला. लोकसभेला मोदी 400 पार जातील अशा प्रकारचा एक्झिट पोल तयार करून घेतलेला. त्याचे काय झाले हे लोकांनी पाहिले असते.
लोकांनी केलेले मतदान गुप्त असते, तरीही काही लोक गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न करतात. पण 23 तारखेला निकाल लागेल आणि 26 तारखेला महाविकास आघाडी सत्तेत येईल. 23 तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्तास्थापनेचा दावाही करू शकतो. महाविकास आघाडीच्या 160-165 जागा निवडून येतील. त्यामुळे एक्झिट पोलवर विश्वास ठेऊ नये. हे भाजप, मिंधे गटाचे षडयंत्र असून आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले हा देखील संशोधनाचा विषय असल्याचे राऊत म्हणाले.
जास्त मतदान झाले म्हणजे भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या असतील असा दावा भाजपकडून केला जात आहे. मात्र भाजपच्या हातात सत्तेच्या चाव्या येतात की कुलुप येतंय हे 72 तासांनी ठरेल, असे राऊत म्हणाले. निवडणुकीमध्ये भाजप, मिंधे, अजित पवार गटाने प्रचंड पैसे वाटले, पैशाचा पाऊस पाडला. यंत्रणेचा गैरवापर केला. तरी ही निवडणूक पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, महाराष्ट्र धर्म या विषयावर लढली गेली. राज्यातील जनतेने पैशाच्या प्रवाहात वाहू न जाता महाराष्ट्रासाठी मतदान केले, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
दरम्यान, केदार दिघेंवर दाखल झालेल्या गुन्ह्यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, हॉटेलमध्ये पैसे पकडूनही तावडेंवर गुन्हा दाखल झाला का? त्या हॉटेलमध्ये काही संशयास्पद महिलांनाही पकडले. महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिंदेंचे पैसे पकडले. नाशिकच्या ताज हॉटेलमध्ये 3 कोटींची रोकड पकडली. कोणावर गुन्हा दाखल झाला? त्यामुळे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर पहिला गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आनंद दिघेंच्या वारसदारावर काय गुन्हा दाखल करता. हे तुमचे दिघेंवरील प्रेम आहे, असा सवाल राऊत यांनी केला.
महाराष्ट्र आपला स्वाभिमानी बाणा कायम राखणार, उद्धव ठाकरे यांचा ठाम विश्वास