नागठाणे सभेत खा.उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, मनोजदादा घोरपडे व सुनील काटकर यांना एकाच हारात गुंफण्यात आले.Pudhari Photo
Published on
:
17 Nov 2024, 2:30 am
Updated on
:
17 Nov 2024, 2:30 am
नागठाणे : एक दोन नव्हे तर तब्बल 35 वर्षे एकाच कुटुंबात कराड उत्तरची धुरा आहे, एकाच घरात सत्ता आहे. 35 वर्षाच्या काळात नेमकं झालं काय आणि केलं काय? ज्या अपेक्षांनी लोकांनी निवडून दिलं त्या पूर्ण झाल्या का? तुमच्या आशीर्वादाला पात्र न ठरणार्या लोकप्रतिनिधींनी आता जागा दाखवा व कराड उत्तरमध्ये परिवर्तन घडवा, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले. मी व आ. शिवेंद्रराजे आम्हाकडून लागणारी सर्व ताकद व सहकार्य मनोजदादांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचारार्थ नागठाणे ता. सातारा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोजदादा घोरपडे, रामकृष्ण वेताळ, सुनील काटकर, पृथ्वीराज निकम, राजेंद्र ढाणे, प्रवीण धस्के, ढाणे बापू, अॅड. प्रवीण गोरे, मनोज देशमुख, अजित साळुंखे, अंजली जाधव, कुलदीप क्षीरसागर उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास होत असताना यामध्ये सातारा जिल्हा कुठेही पाठीमागे राहता कामा नये. यासाठी कराड उत्तरमधून मनोजदादा घोरपडे यांना निवडून आणा. उत्तर मतदारसंघाची संपूर्ण विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे. ती आम्ही पुर्ण करु, जिल्ह्यात कुणावरही अन्याय होवू देणार नाही.
आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा तालुक्यातील कराड उत्तर विभागातून मनोजदादांना मोठ्या संख्येने मतदान होईल. विकास पाहिजे असेल तर आपल्याला महायुती बरोबर राहिले पाहिजे. महाराष्ट्रात उद्याचे सरकार महायुतीचे असणार आहे. महायुतीला कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळे सत्तेपासून आपला मतदारसंघ लांब ठेवून चालणार नाही. केंद्र सरकार महायुतीचे, राज्यात महायुती येणार आहे. त्यामुळे आपला आमदारही महायुतीचाच असला पाहिजे. त्यासाठी मनोजदादांच्या पाठीशी ताकतीने उभे रहा, असे आवाहन त्यांनी केले. सातारा तालुक्यात ज्या काही चर्चा सुरू आहेत त्याकडे लक्ष देऊ नका मनोजदादांसारखे तरुण नेतृत्व आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे. गुलाल हा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अंगावरच दिसला पाहिजे, असेही ते म्हणाले. धैर्यशील कदम यांनी मनोजदादा घोरपडे हे आमदार झाले आहेत. आता गाफील न राहता सर्वानी काम करावे, असे आवाहन केले.
विकासात कमी पडणार नाही : मनोजदादा
मनोजदादा घोरपडे म्हणाले, दोन्ही राजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. सातारा, कोरेगाव, खटाव, कराड या चारही तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर जनतेतून प्रतिसाद मिळत आहे. येणार्या काळात कराड उत्तरच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही असे ते म्हणाले.