हसन मुश्रीफ व समरजित घाटगे यांच्यात अस्तित्वाची लढाई लढली जात आहे.
Published on
:
18 Nov 2024, 12:37 am
Updated on
:
18 Nov 2024, 12:37 am
कोल्हापूर : राजकीय विद्यापीठ अशी ओळख असणार्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये आता पालकमंत्री, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समरजित घाटगे यांच्यात अस्तित्वाची लढाई लढली जात आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले मुश्रीफ आता महायुतीतून, तर भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे घाटगे परस्परविरोधी पक्षातून लढत आहेत. राज्यातील सत्ताबदलानंतर बदलत्या राजकीय भूमिका घेऊन हे दोघे समोरासमोर आले आहेत.
मुळात कागलला मंडलिक आणि घाटगे यांच्यात परंपरागत संंघर्ष. हा संघर्ष एवढा टोकाचा की, कागलमध्ये सोयरिक जुळवितानाही राजकीय गट पाहिले जात होते. एवढी टोकाची ईर्ष्या केवळ कागलमध्येच अनुभवायला मिळाली. काळाच्या ओघात मंडलिक गटातच फूट पडली आणि एकेकाळी मंडलिक गटाचे प्रमुख म्हणून समजले जाणारे हसन मुश्रीफ यांनी आपल्या गुरुविरूद्धच राजकीय आखाड्यात शड्डू ठोकला. त्यानंतर कागलच्या आखाड्यात मंडलिकांचे चिरंजीव संजय विरूद्ध मुश्रीफ असा सामनाही झाला. त्यामध्ये मुश्रीफ यांनी विजय मिळवला. नंतरच्या काळात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संजय मंडलिक यांनी हसन मुश्रीफ यांच्या पॅनलविरोधात लढून स्वत:ची ताकद दाखवत विजय मिळवला. आता हसन मुश्रीफ व संजय मंंडलिक महायुतीचे नेते म्हणून एकत्र आहेत. माजी आमदार संजय घाटगे हे एकेकाळचे मुश्रीफ विरोधकही मुश्रीफ यांच्याबरोबर आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी सख्य असणारे शाहू सहकार समूहाचे प्रमुख समरजित घाटगे हे शरद पवार राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. त्यांचा मुकाबला हसन मुश्रीफ यांच्याशी होत असून, हे दोघेही आपल्या राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहेत. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांना 1 लाख 16 हजार 436 मते मिळाली होती, तर अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या समरजित घाटगे यांना 88 हजार 330 मते मिळाली होती. तेव्हा संजय घाटगे हे शिवसेनेकडून रिंगणात होते. त्यांना 55 हजार 657 मते मिळाली होती. शाहू सहकार समूहाची ताकद समरजित घाटगे यांच्या मागे आहे.
सरसेनापती संताजीराव घोरपडे साखर कारखान्याची ताकद मुश्रीफ यांच्या मागे आहे. 1999 पासून मुश्रीफ हे सातत्याने या मतदारसंघातून निवडून येत आहेत. आता मुश्रीफ व घाटगे यांचा कस लागला आहे. हे दोेघेही केवळ अडीच वर्षांपूर्वी असलेल्या राजकीय भूमिकांच्या संपूर्ण विरूद्ध भूमिकेतून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
यापूर्वी शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी सभा घेतल्या. त्याच पवार यांनी मुश्रीफ यांना पराभूत करा म्हणून आवाहन केले, तर ज्या समरजित घाटगे यांच्या विरोधात त्यांच्या या सभा झाल्या त्या घाटगे यांच्या विजयासाठी पवार झटत आहेत, हे आणखी एक वेगळेपण आहे.