मेळघाटातील 190 मतदान केंद्रांवरील पोलिंग पार्टीज 48 तास आधीच रवाना:इतर मतदारसंघात आज होणार साहित्याचे वाटप

2 hours ago 1
जिल्ह्याच्या आठही मतदारसंघातील मतदान साहित्याचे वितरण मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी होणार असले तरी मेळघाटच्या १९० केंद्रांचे साहित्य मात्र ४८ तास आधी अर्थात आज, सोमवार १८ नोव्हेंबरलाच वितरित करण्यात आले. धारणीच्या एसडीओ कार्यालयात सकाळी १० वाजता साहित्य वितरणाचा प्रारंभ झाला. त्यानंतर मतदान केंद्रनिहाय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या वाहनात या साहित्यासह पुढचा प्रवास सुरु केला. मेळघाट विधानसभा मतदारसंघातील काही गावे दूरवर असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मेळघाट विधानसभा मतदारसंघात एकूण ३५६ मतदान केंद्र आहेत. भौगोलिक रचनेच्यादृष्टीने हा सर्वात मोठा मतदारसंघ आहे. तालुका मुख्यालय असलेल्या धारणीपासून काही गावे बरीच लांब आहेत. त्यामुळे वेळेवर धावपळ होऊ नये, यासाठी १९० मतदान केंद्राच्या अध्यक्षांना ४८ तास आधीच साहित्य पुरविण्याचा निर्णय निवडणूक यंत्रणेने घेतला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यापूर्वी घेतलेल्या आढाव्यादरम्यानच साहित्य वितरणाची आखणी केली होती. त्यात मेळघाटच्या १९० गावांतील मतदान केंद्रे ही फारच लांब असल्याने त्याठिकाणी ४८ तासांआधीच मतदान केंद्रांवरील साहित्य पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. धारणीच्या एसडीओ कार्यालयातून हे साहित्य वितरित करण्यात आले. यामध्ये सीयू, बीयू आणि व्हीव्हीपॅट मिळून बनणारी इव्हीएम मशीन, नमूना बॅलेट पेपर्स, मतदान केंद्राबाहेर लावावयाची सूचना फलके, साहित्य ठेवण्यासाठी लागणारे बॉक्स, शाईचे पेन, सिलींग मटेरियल आणि इतर साहित्याचा समावेश आहे. इतर मतदारसंघात १९ ला वितरण मेळघाट वगळता इतर सर्व सातही मतदारसंघातील मतदान साहित्य मतदानाच्या एक दिवस आधी अर्थात उद्या, १९ नोव्हेंबरला वितरित केले जाणार आहे. मेळघाटातील एकूण मतदान केंद्रांची संख्या ३५६ असल्यामुळे १९० वगळता उर्वरित १६६ मतदान केंद्रांवरील साहित्यही याच दिवशी वितरित केले जाणार आहे. अशी आहे उमेदवारांची संख्या बडनेरा मतदारसंघात २६, धामणगाव रेल्वेत २४, अमरावती व अचलपुर येथे प्रत्येकी २२, मोर्शीत १९, दर्यापुर व तिवसा येथे प्रत्येकी १६ तर मेळघाट विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार मैदानात आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article