Published on
:
03 Feb 2025, 12:32 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:32 am
आजरा ः जुन्या काळात यात्रेसाठी लोक बैलगाडी, सायकल व नंतर मोटारसायकलीवरून येऊ लागले. बससेवा सुरू झाली आणि चाकरमानी बसने येऊ लागले. गावापर्यंत बस नसल्याने आजरा, गडहिंग्लजमधून बैलगागाडीतून येणारे भादवण (ता. आजरा) येथील चाकरमानी आता चक्क विमानाने आले. त्यांचा विमान प्रवास अविस्मरणीय ठरला. यात्रेसाठी चाकरमान्यांच्या बदलत्या प्रवासाचे सर्वांनाच कुतूहल वाटत आहे.
महालक्ष्मी यात्रेसाठी भादवणमधील 33 जण खास विमानाने आले आहेत. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर कार्यरत असणारे आर. बी. पाटील यांनी यात्रेसाठी म्हणून 11 डिसेंबरला 33 ग्रामस्थांचे विमानाचे तिकीट बूक केले. त्याप्रमाणे सकाळी 10.30 वा. सर्वजण मुंबई विमानतळावर दाखल झाले. विमान उड्डाण होताच श्री महालक्ष्मी मातेचा जयघोष करण्यात आला. कोल्हापूर विमानतळावर सकाळी 11.20 वा. सर्वजण दाखल झाले.
ग्रामस्थ ज्ञानदेव पाटील, दत्तात्रय शिवगंड, पांडुरंग केसरकर यांनी स्वागत केले. तेथून स्वतंत्र बसने भादवण गावी दुपारी सर्वजण दाखल झाले. याठिकाणी उपसरपंच संजय पाटील यांनी स्वागत केले. हा अविस्मरणीय क्षण सर्वांनीच डोळ्यात साठवून ठेवला. ग्रामस्थांचा महालक्ष्मी यात्रेसाठी सामूहिक हवाई प्रवास घडवून आणण्याचे स्वप्न पाहिले. ग्रामस्थांनीही त्याला साथ दिली. सामूहिक विमान प्रवासाची आठवण त्यांच्या स्मरणात कायम राहणार आहे. विमान प्रवासातून यात्रेला आलेल्या सर्व मुंबईकर ग्रामस्थांचे मुलींनी लेझीम खेळत स्वागत केले.
भादवणमधील सर्वजण सामान्य कुटुंबातील आहेत. आतापर्यंत त्यांनी बस प्रवास, ट्रॅव्हल व रेल्वे प्रवास केला आहे. महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने पहिल्यांदाच त्यांचा विमान प्रवास घडून आला.
गतवर्षी यात्रेला आलेल्या सर्वांनी पुढील वर्षी विमानाने यात्रेला जाण्याचा निश्चय केला होता. त्याप्रमाणे यावर्षी यात्रेला विमानाने येऊन भादवणकरांनी निश्चय सत्यात उतरवला.