मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Pudhari File Photo
Published on
:
08 Feb 2025, 1:12 am
Updated on
:
08 Feb 2025, 1:12 am
पणजी : राज्यातील जनतेला 24 पाणीपुरवठा देणे शक्य नसले तरी 2026 पूर्वी प्रत्येक घरात दररोज किमान 4 तास पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मये आणि डिचोली भागातील पाणीटंचाई बाबत मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना ते बोलत होते.
मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्यात आवश्यक पाणी असून, त्याचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. यासाठी राज्य सरकारच्या वतीने 350 कोटी रुपये खर्चून पाणीपुरवठा संदर्भातल्या योजनांची पूर्तता करण्यात येत आहे. मागील आठवड्यात उत्तर गोव्याला पाणीपुरवठा करणारा तिळारी कालवा फुटल्याने त्या दरम्यानच्या काळात पाणीटंचाई निर्माण झाली होती. आता येथील परिस्थिती सुरळीत झाली आहे. याला पर्यायी असणार्या आमठाणे धरणातून अस्नोडा, पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पांना कच्चे पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यातील कालव्यांचे काँक्रिटीकरण सुरू आहे. या पाणीपुरवठा योजनेतील 28 कि. मी.चा कालवा महाराष्ट्रातून येतो. त्याच्या दुरुस्तीसाठी आणि काँक्रिटीकरणासाठी राज्याचा वाटा असणारे पैसे तातडीने महाराष्ट्राला देण्यात येतील. हे काम पूर्ण झाल्यास पुढील 25 वर्षे पाणीटंचाई भासणार नाही. सध्या राज्यातील 40 टक्के जनतेला 16 क्युबिक लिटर पाणी मोफत देण्यात येते. आणि ते यापुढेही देण्यात येईल. किनारी भागातील पाण्याची आवश्यकता पाहून पाणीपुरवठा केला जाणार आहे. ‘हर घर जल’ झालेले गोवा हे एकमेव राज्य आहे, असेही ते म्हणाले.
उत्तर गोव्यातील किनारी भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक रहिवाशांच्या घरांबरोबर हॉटेल, रिसॉर्ट, पर्यटक प्रकल्प होत आहेत. त्यामुळे या भागातली पाण्याची मागणी वाढली आहे. या प्रकल्पांना मंजुरी देतानाच, पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. याकडे राज्य सरकारने गांभीर्याने पाहवे, असे आमदार मायकल लोबो म्हणाले.