महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. पैसा वाटला गेला. खून व मारामाऱया झाल्या, धमक्या दिल्या गेल्या, पण निवडणूक आयोगाने काय केले? आयोगाला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे. अदानीचे किमान 3000 कोटी महाराष्ट्राच्या निवडणुकीत जिरवले. त्या अदानीविरुद्ध अमेरिकेत अटक वॉरंट निघाले. तेथले सरन्यायाधीश निष्पक्ष आहेत व राष्ट्राध्यक्ष त्यांच्या घरी ख्रिसमसला केक खायला जात नाहीत!
भारताच्या निवडणूक आयोगाला श्रद्धांजली वाहावी अशी वेळ आली आहे. न्यायालये तर केव्हाच ‘आयसीयू’मध्ये गेली आहेत. शेषन यांनी निवडणूक आयोगाला प्रतिष्ठा व दरारा प्राप्त करून दिला. त्याची माती सध्याच्या निवडणूक आयोगाने केली. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत एका मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी असलेला पोलीस, मतदानास आलेल्या मुस्लिम महिलांवर बंदूक रोखून त्यांना मतदान करण्यापासून रोखत आहे, धमकावत आहे. मतदानाला याल तर याद राखा, असा इशारा देत असल्याचा व्हिडीओ जगभर पोहोचला व भारतातील लोकशाहीची मान शरमेने खाली गेली. हे ‘रोखठोक’ वाचकांच्या हाती पडेपर्यंत महाराष्ट्रातील विधानसभांचे निकाल लागलेले असतील, पण या निकालांवर तरी लोकांचा भरवसा राहील काय? महाराष्ट्रात ठिकठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी दहशतीचे वातावरण निर्माण केले व निवडणूक आयोगाने काहीच कारवाई केली नाही. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार कांदे याने त्याच मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर उघडपणे धमकी दिली, “आज संध्याकाळी तुझा मर्डर फिक्स आहे!” या भयंकर प्रकारानंतरही निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन चूप राहिले.
तावडे आणि ठाकूर
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले. लाखो रुपयांची रोकड यात दिसली, पण निवडणूक आयोगाने पैसेवाटपाबाबत गुन्हा दाखल केला नाही आणि ज्या ठाकुरांनी हा सर्व खेळ केला ते ठाकूर चार तासांनंतर विनोद तावडे यांना घेऊन जेवायला गेले. लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? तावडे यांचे पैसेवाटप सुरू आहे, अशी माहिती आपल्याला भाजपच्या नेत्यांनी दिल्याचे ठाकुरांनी जाहीर केले. त्यामुळे श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात जे विकृत घडत आहे ते फक्त फडणवीस यांच्यामुळेच हे लोकांच्या मनात पक्के ठसून गेले. तावडे यांच्याकडे रोख सापडली, पण गुन्हा दाखल झाला नाही व तावडे यांच्या बचावासाठी आश्चर्यकारकरीत्या देवेंद्र फडणवीस पुढे आले. “तावडे निर्दोष आहेत. त्यांच्याकडे रोख रक्कम नव्हती. ते कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण घ्यायला विरारला गेले,” असे फडणवीस म्हणतात. ही त्यांनी स्वतःचीच केलेली फसवणूक. लाखो रुपये पकडले, पण गुन्हा नाही. मग आचारसंहितेच्या नावाने जागोजाग निवडणूक आयोगाने चौक्या बसवून तपासण्याचे नाटक केले ते कशासाठी? हा प्रश्न आहे. पुन्हा या चौक्यांवरील पोलीस व होमगार्डचे लोकही गुजरात, राजस्थानातूनच महाराष्ट्रात आणले हे आता समोर आले. यास काय म्हणावे? महाराष्ट्राचे सर्वच स्तरांवर गुजरातीकरण झाले. त्याचा हा नमुना.
बेइमान पुन्हा येणार नाहीत
महाराष्ट्राचे निकाल काय लागतील हे ‘एक्झिट पोल’ने जाहीर केले. हे सर्व पोल म्हणजे मोठा घोटाळा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बेइमान गटास उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळतील असे या पोल्समध्ये सांगणे ही अकलेची दिवाळखोरी आहे. ‘महाराष्ट्रात पुन्हा शिंदे-फडणवीस, अजित पवारांचे राज्य नको. झाले तेवढे पुरे. महाराष्ट्र बेइमान मुक्त होवो,’ अशी सार्वत्रिक लोकभावना आहे. पैशांचा वादळी वापर करूनही या लोकांना विजय मिळवता येणार नाही. महाराष्ट्राचे राज्य अदानीसारख्या भ्रष्ट उद्योगपतीच्या हाती जाऊ नये व हे ‘अदानी राष्ट्र होऊ नये’ यासाठी उद्धव ठाकरे यांनी मते मागितली. ते किती खरे होते हे मतमोजणीनंतर लगेच समोर आले. गौतम अदानी व त्यांच्या लोकांनी सरकारी कामे मिळविण्यासाठी 280 बिलियन डालर्सची म्हणजे 2 हजार कोटींची लाच सरकारी अधिकाऱयांना दिली. ते अमेरिकेच्या न्यायालयात समोर आले. तेथील प्रशासनाने आता अदानी यांच्या विरोधात अटक वारंट काढले. त्यामुळे जगात भारताची नाचक्की झाली. अदानी व मोदी एकाच नाण्याच्या दोन बाजू. हे दोघे वेगळे नाहीत. त्यामुळे अमेरिकन प्रशासनाने एकप्रकारे मोदींच्या चेहऱ्यावरील अदानींचा मुखवटा उतरवला. अमेरिकेतील न्यायालये भारताप्रमाणे विकत घेता येत नाहीत व तेथील मुख्य न्यायाधीशांच्या घरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ख्रिसमसचा केक खाण्यासाठी जाणार नाहीत. त्यामुळे सेबी व भारतीय न्यायालयातून सुटलेले अदानी अमेरिकेच्या न्यायालयातून सुटणार नाहीत. याच अदानी यांना मोदी-शिंदे-फडणवीस यांनी धारावीसह मुंबईतील मोक्याच्या जमिनी दिल्या. मुंबईचे विमानतळ, जकात नाके, मिठागरांच्या जमिनी दिल्या व त्या बदल्यात कालच्या विधानसभा निवडणुकीत किमान तीन हजार कोटी रुपये शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यासाठी खर्च कले. हे महाराष्ट्राच्या विरोधातले कारस्थान यशस्वी होणार नाही आणि महाराष्ट्राला लागलेला गद्दारीचा कलंक पुसला जाईल, याविषयी माझ्या मनात शंका नाही.
हे ‘रोखठोक’ वाचकांच्या हातात पडेपर्यंत एक्झिट पोलची ऐशी की तैशी करणारे निकाल जाहीर झालेले असतील आणि महाराष्ट्र जिंकेल! महाराष्ट्र जिंकेल तेव्हा निवडणूक आयोगाला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम पूर्ण होईल!
TWITTER – @rautsanjay61
GMAIL – [email protected]