Published on
:
24 Nov 2024, 1:32 am
Updated on
:
24 Nov 2024, 1:32 am
कर्जत : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघात शरद पवारांचे नातू रोहित पवार अवघ्या 1243 मतांनी विजयी झाले. मत मोजणीदरम्यान पवारांचा पराभव होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली असताना शेवटच्या फेरीत पवार निसट्या मतांच्या फरकाने विजयी झाले. तीन अंकी मताधिक्यामुळे रोहित पवारांची गाडी जमिनीवर आली. भूमिपुत्र असलेले भाजपचे आमदार राम शिंदे यांनी कडवी झुंज देत पवारांची दमछाक केली.
भाजपचा बालेकिल्ला कर्जत-जामखेड मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार आमदार झाले होते. दीड वर्षापूर्वी भाजपने विधान परिषदेवर संधी देत शिंदे यांचे पुनर्वसन केले; मात्र 2019 चा पराभव शिंदे यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळेच त्यांनी 2024 ची विधानसभा निवडणूक रोहित पवारांच्या विरोधात लढविण्याचा निर्णय घेतला. भाजपनेही त्यांना ग्रीन सिग्नल दिला.
या निवडणुकीत राम शिंदे यांनी भूमिपुत्राच्या मुद्द्यासोबतच विकासाच्या प्रश्नावर रोहित पवार यांना घेरले. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य शिंदे व रामदास आठवले या दिग्गजांना प्रचाराला आणत शिंदे यांनी पवारांना कोंडीत पकडले. आमदारकीच्या काळात मतदारसंघात उभारलेल्या शासकीय इमारती, एमआयडीसी यावर फोकस करत पवारांनी शिंदे यांच्या प्रचाराची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. पवारांसाठी आजोबा शरद पवारांनी प्रचाराची सांगता सभा घेतली.
मतमोजणीवेळी सुरुवातीला आघाडीवर असलेले राम शिंदे मध्यंतरी काहीसे मागे पडले. नंतर कधी शिंदे तर कधी पवार मताधिक्य घेताना दिसले. त्यामुळे अखेरच्या 26 व्या फेरीपर्यंत पवार-शिंदेंची विजयासाठीची रेस सुरू होती. मात्र, अखेरच्या फेरीत रोहित पवारांनी 668 निर्णायक मते घेत आघाडी घेतली. पोस्टल मतमोजणीतही पवारांच्या बाजूने कौल दिला. रोहित पवार यांना पोस्टलची 555 मते जास्त मिळाल्याने त्यांची आघाडी 1243 झाली. त्यामुळे पवार यांचा विजय निश्चित झाला. राष्ट्रवादी फुटीनंतर रोहित पवार हे राज्याचे नेते म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट करू पाहत होते. प्रचारादरम्यान त्यांनी राज्यभर सभा घेतल्या. मात्र, या निकालाने रोहित पवार यांच्या राज्याचा नेता होण्यालाही ब्रेक मिळाल्याचे चित्र आहे.