Published on
:
31 Jan 2025, 1:10 am
Updated on
:
31 Jan 2025, 1:10 am
सध्या एका चिनी तरुणाने अख्ख्या अमेरिकेची झोप उडवली आहे. या तरुणाने बनवलेल्या स्वस्त आणि मस्त अशा एका एआय अॅपने बड्या अमेरिकन कंपन्यांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान केले. या तरुणाचे नाव लियांग वेनफेंग आणि त्याने बनवलेल्या एआय मोबाईल अॅपचे नाव ‘डीपसीक’. या अॅपमुळे सध्या अमेरिकेतील शेअर बाजारात जणु भूकंपच झाला आहे. सोमवारी डीपसीक लाँच झाल्यानंतर अमेरिकेतील ‘एनविडिया’ कंपनीचे शेअर्स चार महिन्यांतील नीचांकी स्तरावर पोहोचले. कंपनीचे तब्बल 600 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. त्यामुळे अमेरिकेतील टेक कंपन्यांचा वरचष्मा असलेल्या नॅसडॅक शेअर बाजारात तीन टक्क्यांहून अधिक घसरण झाली. यामध्ये प्रामुख्याने मेटा, गुगल, अॅपल, एनवीडिया, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे.
‘डीपसीक’ हे चीनचे अद्ययावत ‘एआय’ मॉडेल आहे. चीनची सिलिकॉन व्हॅली म्हटल्या जाणार्या हँगझोऊ येथील ‘डीपसीक’ नावाच्या कंपनीत ते विकसित करण्यात आले. या कंपनीची स्थापना 2023 मध्ये लिआंग वेनफेंग या चिनी एआय इंजिनिअरने केली. सोप्या भाषेत सांगायचे, तर हे ‘डीपसीक’ म्हणजे ‘ओपन एआय’च्या ‘चॅट जीपीटी’चा चिनी पर्याय आहे; मात्र यात सर्वात मोठा फरक म्हणजे चॅट जीपीटीपेक्षा अतिशय कमी खर्चात हे तंत्रज्ञान उभे केले आहे. अॅपलच्या अॅप स्टोअरवर डीपसीकचे मोबाईल अॅप मोफत डाऊनलोड करून घेता येते. ते चॅट जीपीटीप्रमाणेच विचारलेल्या बाबींवर माहिती पुरवते; मात्र त्यासाठी ते अत्यंत कमी सामग्रीत व पर्यायाने कमी खर्चात काम करते. त्यामुळे सध्याच्या प्रचलित एआय मॉडेलसाठी लागणारी खर्चिक सामग्री, चिप व अन्य तंत्रज्ञानाची गरज मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे चिपसारखी अशी सामग्री तयार करणार्या एनवीडियासारख्या कंपन्यांना याचा मोठा फटका बसला. हे ‘डीपसीक’ बनवणारे लियांग अवघ्या 40 वर्षांचे आहेत.
लियांग यांचा जन्म चीनच्या झानजियांग राज्यात झाला. त्यांचे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक होते. लहानपणापासूनच हुशार, चौकस विद्यार्थी असलेल्या लियांग यांना नव्या गोष्टी शिकण्याची धडपड होती. चीनच्या झोजियांग विद्यापीठातून 2007 मध्ये त्यांनी ‘आयटी इंजिनिअरिंग’मध्ये पदवी घेतली. 2010 मध्ये त्यांनी आयटी इंजिनिअरिंगचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी रिसर्च मॅनेजमेंटच्या दरम्यान टार्गेट ट्रॅकिंग अल्गोरिदम शोधले होते. त्याचा कमी खर्चातील पीटीझेड कॅमेर्यात वापर केला जातो. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एआयशी संबंधित अनेक कंपन्यांची स्थापना केली. त्यामध्ये हांग्जो याकेबी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट कंपनी, झोजियांग जियुझांग अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, हायफ्लायर एआय यांचा समावेश होतो. 2023 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या ‘डीपसीक’चे ते स्वतः सीईओ आहेत. विचित्र केशरचना, चष्मा असलेल्या या तरुणाकडे सुरुवातीला कोणी गांभीर्याने पाहत नव्हते; मात्र आता याच तरुणाचा जगभर बोलबाला आहे.