खंडाळा : खंडाळा तालुक्यातील वंचित 14 गावांच्या पाणी प्रश्नासाठी मी सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. वंचित 14 गावांना पाणी देणारच हा माझा शब्द आहे. निरा-देवधर व धोम बलकवडी प्रकल्पातील उर्वरित कामांची टेंडरही लवकरच निघणार आहेत. संपूर्ण खंडाळा तालुका 100 टक्के पाण्याखाली आलेला असेल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.
खंडाळा तालुक्यातील जनतेच्यावतीने बावडा ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या भव्य सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ना. मकरंद पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी खंडाळा तालुक्याचे भुमिपुत्र व पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरिष पाटणे होते.
खंडाळा तालुक्याच्या आम जनतेच्यावतीने बावडा ग्रामस्थांतर्फे व खंडाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मदत व पुनर्वसन मंत्री झाल्याबद्दल नामदार मकरंद पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रतापराव पवार, माजी जि.प. अध्यक्ष उदय कबुले, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राजेंद्र शेलार, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही.जी.पवार, माजी कृषी सभापती मनोज पवार, अॅड. शामराव गाढवे, तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ, माजी सभापती राजेंद्र तांबे, किसनवीरचे व्हा. चेअरमन प्रमोद शिंदे, राजेंद्र राजपूरे, दिलीप पिसाळ, प्रा. एस. वाय. पवार, लोणंद बाजार समिती सभापती सुनील शेळके, गणेश धायगुडे, सरपंच किशोर पवार, उपसरपंच निलम गाढवे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ना. मकरंद पाटील म्हणाले, विधानसभेच्या सलग चौथ्या निवडणुकीत खंडाळा तालुक्याने भरभरून मते दिली. जनतेच्या आशीर्वादाने मंत्री म्हणून राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली. सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघातील उर्वरित प्रश्न सोडवण्यावर आहे. मतदारसंघातील जनतेच्या विश्वासाच्या बळावर राजकारणात यशस्वी झालो. जनतेच्या या विश्वासाला तडा जावू देणार नाही. नीरा देवधरचे खंडाळा तालुक्याच्या वाट्याचे पाणी उपसा सिंचन योजना मार्गी लागल्यानंतर शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचेल. त्यामुळे उर्वरित क्षेत्र ओलिताखाली येईल, असेही त्यांनी सांगितले.
हरिष पाटणे म्हणाले, खंडाळा तालुक्याचा भूमिपुत्र या नात्याने या व्यासपीठावर मी उपस्थित आहे. मकरंद पाटील यांच्या गेल्या 25 वर्षाच्या राजकीय सामाजिक वाटचालीचा मी जवळचा साक्षीदार आहे. मांढरदेव दुर्घटनेत दुर्घटनाग्रस्तांना मदत करणारे, कोविड काळात गोरगरीब रुग्णांसाठी धावून जाणारे कांदाटी खोर्यात दुर्घटनाग्रस्तांना मदत करणारे मकरंदआबा आम्ही अनेकदा पाहिले आहेत. जनतेच्या संकट काळात त्यांना मदत करणारे व सुयोग्यपणे पुनर्वसन करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर राज्याच्या मदत व पुनर्वसन मंत्री पदाची जबाबदारी आली आहे. त्यांच्या कारकिर्दीत दुष्काळी खंडाळ्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा. मंत्रीपदाच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब जनतेचे अश्रू पुसावेत. आजही खंडाळा तालुक्यातील 14 गावे पाण्यापासून वंचित आहेत या चौदा गावांचा समावेश प्रकल्पामध्ये करावा. मदत व पुनर्वसन खात्याच्या माध्यमातून ना. मकरंद पाटील यांनी सातारा जिल्ह्याचाही नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा पाटणे यांनी व्यक्त केली.
नितीन भरगुडे पाटील म्हणाले, मकरंदआबांच्या मंत्रिपदामुळे सर्वसामान्य जनतेला आनंद झाला आहे. गेली कित्येक वर्षे आमचा नेता सामान्य जनतेसाठी झटत आहे. खंडाळा तालुक्यातील जनतेला खर्या अर्थाने आता न्याय मिळेल. आबांच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदारसंघाचा कायापालट होईल. कार्यकर्त्यांनी आता गाफील राहू नये. निवडणुकांसाठी कामाला लागावे. मकरंदआबांना जास्तीत जास्त राज्यात लक्ष द्यायचे आहे. ग्राउंडवर कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मनोज पवार यांनी स्वागत केले. किशोर पवार यांनी आभार मानले.