विधानसभा निवडणुकीतून यंदा मतदारसंघातील विकासाचे मुद्दे गायब झाल्याचे दिसून येत आहे.File Photo
Published on
:
17 Nov 2024, 11:54 pm
Updated on
:
17 Nov 2024, 11:54 pm
पानीव : माळशिरस तालुक्यातील विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आ. राम सातपुते, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उत्तम जानकर यांच्यात पुन्हा एकदा सामना होत आहे. 2019 च्या निवडणुकीत राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांचा पराभव केला होता. पण लोकसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकीय परिस्थितीत मोठा बदल झाला आहे. मात्र, या निवडणुकीत तालुक्यातील विकासाचे प्रश्न बाजूला सारले गेले असून प्रचार जातीपातीच्या समीकरणांवरच केंद्रित झाला आहे.
माळशिरस तालुक्यात अनेक ज्वलंत प्रश्न सध्या जनतेला भेडसावत आहेत. तालुक्यातील साखर कारखानदारांनी ऊस दराच्या बाबतीत शेतकर्यांच्या तोंडाला पानेच पुसले आहेत. दुधाच्या दराच्या बाबतीत ही परिस्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. अनेक सुशिक्षित तरुण रोजगारासाठी भटकत आहेत. परंतु तालुक्यात नवीन रोजगार निर्मितीची व्यवस्था पूर्णपणे ठप्प झालेली असताना पाण्याचा प्रश्न, शेतकर्यांचे अडचणीत असणे, आणि बेरोजगारी या समस्या जसाच्या तशा आहेत. याबाबत कुठलाही उमेदवार चकार शब्दही काढत नाही. राजकीय परिस्थितीत बदल झाला असला तरी मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांवर कोणतेही ठोस उत्तर कुणाकडे नाही. प्रचारातील एकूण चर्चा ही केवळ जुने व्हिडीओ, वैयक्तिक आरोप, आणि जातीच्या गणितांभोवती फिरते आहे.
माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांना अजूनही उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. पाणी टंचाई सोडवण्यासाठी पाणीपुरवठा योजना आणि सिंचन प्रकल्पांची आवश्यकता होती. परंतु, या दिशेने कोणतीही ठोस पावले उचललेली दिसत नाहीत. निवडणूक प्रचारात मात्र पाण्याच्या समस्येचा साधा उल्लेखही होत नाही. तालुक्यातील तरुणांना रोजगाराची हमी देण्यासाठी एमआयडीसी स्थापन करण्याची वर्षानुवर्षे आश्वासने दिली जात आहेत. पण प्रत्यक्षात उद्योगधंदे उभारले गेलेले नाहीत. अनेक शिक्षित तरुण बेरोजगार आहेत. रोजगाराच्या ठोस योजना किंवा नवीन संधी निर्माण करण्यावर कोणत्याही उमेदवारांचा भर दिसत नाही.
याऐवजी, जातीय समीकरणांवर भर देऊन तरुण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुक्यातील शेतकर्यांना हमीभावाचा प्रश्न कायम आहे. भाजीपाला व अन्य पिकांच्या बाजारभावात अस्थिरता आहे, पण कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. दुधाच्या दरांमध्ये अस्थिरता असल्याने दुग्ध व्यवसाय करणे शेतकर्यांसाठी तोट्याचा ठरत आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. निवडणुकीत या प्रश्नांवर कोणताही उमेदवार ठोस उपाययोजना सुचवत नाही.
विकासाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष
दोन्ही उमेदवार जुने व्हिडीओ, व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोप आणि वादग्रस्त वक्तव्यांवरून जनतेचे लक्ष मूलभूत प्रश्नांवरून विचलित करत आहेत. माळशिरसच्या जनतेने आता जातीपातीच्या पलीकडे जाऊन विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करणे गरजेचे आहे, अन्यथा पुढील पाच वर्षांतही तालुक्याच्या समस्या जसाच्या तशा राहतील आणि हा भाग मागेच राहील.