Published on
:
05 Feb 2025, 12:40 am
Updated on
:
05 Feb 2025, 12:40 am
चिपळूण : मार्च महिना जवळ आला की, सर्वच आस्थापनांना वसुलीचे वेध लागतात. आता महावितरण कार्यालयामार्फत देखील वीज बिल थकबाकीची वसुली मोहीम सुरू झाली आहे. महावितरणच्या चिपळूण विभागांतर्गत तब्बल दोन कोटींची थकबाकी आहे. विशेषकरून शासकीय कार्यालयेदेखील थकबाकीदार बनली असून चिपळूण पं. स. तथा गटविकास अधिकारी देखील थकबाकीदारांच्या यादीत आले आहेत. चिपळूण पं. स.कडे महावितरणची वर्षभराची 1 लाख 21 हजार 60 रुपयांची थकबाकी असल्याचे पुढे आले आहे.
महावितरणच्या माध्यमातून अलीकडे जोरदार वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी थकीत वीज बिल भरावे म्हणून रिक्षाच्या माध्यमातून ध्वनिक्षेपकावर आवाहन केले जात आहे. चिपळूण व गुहागर तालुक्यात महावितरणचे एकूण 12 हजार 93 थकबाकीदार ग्राहक आहेत. त्यांची 1 कोटी 97 लाख 490 रुपयांची थकबाकी आहे.
विशेषकरून शासकीय कार्यालयांची देखील मोठी थकबाकी आहे. चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयांची थकबाकी लाखांच्या आसपास आहे. चिपळूण पंचायत समितीची अर्थात गटविकास अधिकार्यांची 1 लाख 23 हजार 60 रुपये, तसेच दुसर्या ठिकाणी 50 हजार 870 रुपयांची वसुली दिसत आहे. त्यामुळे महावितरणचे अधिकारी या वसुलीसाठी आता शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत.
कळंबस्ते येथील पशुसंवर्धन विभागांतर्गत असलेल्या कार्यालयाची 28 हजार 209 रु., चिपळूण शहरातील परकार कॉम्प्लेक्स समोरील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाची 61 हजार 318 रुपयांची थकबाकी आहे. ही वसुली लवकरात लवकर व्हावी यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी संबंधित कार्यालय प्रमुखांची भेट घेत आहेत. मात्र, अजूनही त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. मोठे थकबाकीदार आता रडारवर आले असून महावितरणकडून मोठ्या थकबाकीदारांकडे लक्ष वळविण्यात आले आहे. जर ही वसुली वेळेत झाली नाही तर संबंधितांवर कारवाईची टांगती तलवार आहे.