छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटकेसाठी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असा खळबळजनक दावा ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात नवीन वादाला तोंड फुटले आहे. बिकट परिस्थितीत अत्यंत शिताफीने स्वतःची सुटका करून शिवरायांनी अवघ्या 8 महिन्यात मुघलांना तहात दिलेली सर्व किल्ले पुन्हा स्वराज्यात आणली होती. पण सोलापूरकरांनी केलेले वक्तव्य वादाची पेरणी करणारे ठरले. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पण त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
सोलापूरकरांचा दावा काय?
इतिहासाचे आकलन आणि मांडणी करताना ती सापेक्ष करणे अभिप्रेत असते. काही जण ती अतिरंजित करतात, तर काहींचा नको तो आशय शोधण्याचा प्रयत्न असतो. राहुल सोलापूरकर यांचे वक्तव्य हे अशाच सदरात मोडते. छत्रपती शिवाजी महाराज उत्तरेत गेल्यानंतर औरंगजेबानं त्यांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले. त्यावेळी सहिसलामत सुटण्यासाठी त्यांनी मिठाईच्या पेटऱ्यांचा वापर केला होता. याची इत्यंभूत हकीकत तत्कालीन औरंगजेबाच्या दरबारी नोंदीत सापडतात. पण अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत राजे पेटाऱ्यातून नाही तर लाच देऊन सुटल्याचा दावा केला. त्यावरून एकच वाद उफळला आहे.
हे सुद्धा वाचा
छगन भुजबळ यांचा संताप
या लोकांना वेड लागलंय का? असा संतप्त सवाल भुजबळांनी केला. शिवाजी महाराज मोठ्या सफाईने सुटले. स्वराज्य निर्माण केलं. त्यांची सुटका ही हुशारी आणि रणनीतीचा भाग होता. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज सोबत आले असते तर संकट आलं असतं. संभाजी महाराजांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी सोडलं होतं. त्याविषयी मॉसाहेब जिजाऊ यांनी विचारलं होत हा इतिहास आहे, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली.
राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख?
“हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख? हा मूर्ख माणूस सध्या राज्याला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न अशा फडतूस माणसांकडू केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.” अशी जळजळीत प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
वक्तव्य मागे घ्या
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वक्तव्य माघारी घ्यावे आणि माफी मागावी अशी मागणी हिंदू महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. छत्रपतींच्या बुद्धी चतुर्या आणि धाडसावर शंका घेणं हे पापच आहे. आग्रा येथून सूटताना महाराज लाच देऊन सुटले हे राहूल सोलापूरकर यांचे विधान धक्का दायक आहे
पेटारे वगैरे सर्व खोटं आहे हे म्हणणं तर राग यावा असं आहे. अगदी तत्कालीन संदर्भ पासून ते आज पर्यंत कोणत्याही इतिहासकारांमधे सुद्धा या बाबत मतभेद नाहीत. असं असताना तब्बल 1000 सैनिकांच्या बंदोबस्तमधून मग महाराज सुटले तरी कसे हे पण त्यांनी सांगायला हवं. पुराव्या शिवाय आत्ता महाराजांच्या नव्या इतिहासची गरज नाही, अशी प्रतिक्रिया दवे यांनी दिली.