भाजप-एनडीए सरकार देशातील केवळ २० ते २५ मोठ्या व्यापाऱ्यांना मदत करते. या सरकारने त्याच व्यापाऱ्यांचे तब्बल १६ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. मात्र राज्यात आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ करू, सोयाबीनला प्रतिक्विंटल सात हजार रुपये तसेच कापसालाही योग्य भाव देऊ, असे आश्वासन काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी दिले आहे. जिल्ह्यातील काँग्रेस, महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी धामणगाव रेल्वे येथे खा. राहुल गांधी यांची सभा झाली. या वेळी तिवस्याच्या उमेदवार यशोमती ठाकूर, धामणगावचे उमेदवार वीरेंद्र जगताप, अचलपूरचे उमेदवार बबलू देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. भाजपने शेतकरी, लहान उद्योजक, व्यापारी यांना संपवण्यासाठी ‘जीएसटी’ आणला आहे. शेतात राबणारा मजूर त्याच्या मुलीसाठी साडी विकत घ्यायला गेला तरीही १८ टक्के जीएसटी आणि अदानी, अंबानी असे अब्जाधीश साडी खरेदी करायला गेले तरीही त्यांना १८ टक्केच जीएसटी लागतो. वास्तविक देशभरात जमा होणारा जीएसटी दिल्लीत पोहोचतो आणि तेथून त्याचे वितरण होते. या वितरणातही नेहमीच भाजपने दुजाभाव करून दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीयांवर अन्याय केला असल्याचेही काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी म्हणाले. २५ लाखांचा आरोग्य विमा गरीब व्यक्तीलाही खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावा, यासाठी आम्ही प्रत्येकाचा २५ लाखांचा आरोग्य विमा उतरवू, अशी योजना आम्ही राजस्थानमध्ये राबवली होती. राज्यात सरकार आल्यास महाराष्ट्रात आम्ही त्याप्रकारचे आरोग्य विमा कवच देऊ, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)