Published on
:
15 Nov 2024, 11:34 pm
Updated on
:
15 Nov 2024, 11:34 pm
वॉशिंग्टन : ‘मृत्यू’ या विषयावर आतापर्यंत अनेक प्रकारचे संशोधन झालेले आहे. मात्र, शरीरावर मृत्यू कशा वेगाने ताबा घेतो याबाबतही संशोधन झालेले आहे, याची तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही आत्तापर्यंत प्रकाशाचा वेग किंवा जगातील सर्वाधिक वेगाने धावणार्या गाडीचा किंवा उडणार्या विमानाचा वेग ऐकला असेल. मात्र, शास्त्रज्ञांनी असा मरणाचा वेगही शोधून काढल्याचा दावा केला होता. अमेरिकेमधील स्टॅण्डफोर्ड विद्यापीठातील दोन शास्त्रज्ञांनी ‘स्पीड ऑफ डेथ’ या विषयावर संशोधन केले असून, त्यांनी मरण शरीरामध्ये किती वेगाने पसरते याचा वेळ शोधून काढल्याचे दावा केलेला आहे.
या अभ्यासानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा जैवशास्त्रानुसार एका क्षणात मरत नाही. शरीरातील सर्व पेशी एकाच वेळी मरण पावत नाहीत. संपूर्ण शरीरामधील पेशी टप्प्याटप्प्याने मरण पावतात. हाच वेग या दोन शास्त्रज्ञांनी मोजला असून, हा वेग म्हणजेच ‘मरणाचा वेग’ असल्याचे त्यांनी सांगितले. या संशोधनानुसार ‘मृत’ घोषित करण्यात आल्यानंतर मरण त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये दर मिनिटाला 30 मायक्रोमीटर म्हणजेच दोन मिलीमीटर (0.2 सेंटिमीटर) प्रति तास या वेगाने पसरते. म्हणजेच या वेगाने शरीरामधील पेशी एक-एक करून मरण पावतात. म्हणजेच मृत घोषित झाल्यानंतर शरीरामधील एक सेंटिमीटर अंतरातील पेशी मृत होण्यासाठी पाच तास लागतात. पेशी मरण पावण्याच्या याच वेगाला शास्त्रज्ञांनी ‘मरणाचा वेग’ असे म्हटले आहे. ‘सायन्स’ या मासिकामध्ये छापून आलेल्या या संशोधनासंदर्भातील अहवालामध्ये प्रोग्राम सेल डेथ (पीसीडी) म्हणजेच नियोजित पद्धतीने पेशी मरण पावण्याची प्रक्रियाबद्दल माहिती देण्यात आली आहे. पीसीडीची प्रक्रिया ही खूप सावकाश पद्धतीने होते. पेशींनी नियोजित पद्धतीने मरण पावण्याच्या या प्रकाराला वैज्ञानिक भाषेत ‘अॅपोपटीस’ असे म्हणतात. ‘अॅपोपटीस’बद्दल शास्त्रज्ञांना बर्याच काळापासून माहिती आहे. मात्र, पहिल्यांदाच शास्त्रज्ञांनी ‘अॅपोपटीस’ ही प्रक्रिया किती वेगाने होते हे मोजले. व्यक्ती मरण पावल्यानंतर ‘अॅपोपटीस’ प्रक्रिया पेशींच्या एका समूहाकडून दुसर्या समूहाकडे एखाद्या लाटेप्रमाणे पसरत जाते. ही लाट म्हणजे एक प्रकारची रसायनिक प्रक्रिया असते ज्यामुळे पेशींचा मृत्यू होतो.