Published on
:
04 Feb 2025, 5:58 am
Updated on
:
04 Feb 2025, 5:58 am
नेवासा : सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे यंदा गळीत हंगाम उशिराने सुरू झाले असले तरी फेब्रुवारीअखेरच कारखाने बंद पडण्याची शक्यता असल्याने साखर कारखान्यांची यंदा उद्दिष्ट पूर्तीसाठी दमछाक होत आहे.
सहकारी साखर कारखान्यात एकीकडे ऊस दराची स्पर्धा, त्यात खासगी साखर कारखान्यांची एन्ट्री, यामुळे यंदा साखर उद्योगात ऊसटंचाई भासू लागली आहे. दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यांपर्यंत सुरू राहणारे गळीत यंदा फेब्रुवारीतच आटोपते घेण्याची वेळ आली आहे. म्हणजे दोन ते तीन महिने अगोदरच साखर कारखान्यांना गळीत हंगाम उसाअभावी थांबवावे लागणार असल्याचे चित्र साखर कारखाने कार्यक्षेत्रात दिसत आहे.
ज्या ज्या साखर कारखान्यांची उसाचे अधिक दर जाहीर केले. त्यांच्याकडे यंदा ऊसउत्पादकांचा ओढा दिसून येत आहे. उसाचा वाढलेला उत्पादन खर्च, रासायनिक खतांच्या गगनाला भिडत चाललेल्या किंमती, सतत उसाची पिके ठेवल्याने शेतजमिनींचा घसरलेला पोत, पाण्याची टंचाई आदी कारणांमुळे ऊसउत्पादक अन्य पिकांकडे वळताना दिसत आहेत.
एकीकडे साखर कारखान्यांची वाढत चाललेली संख्या, तर दुसरीकडे ऊसउत्पादनात झालेली घट साखर कारखानदारीला धोक्याची घंटा मानली जात आहे.
साखर कारखाना कार्यक्षेत्रात यंदा उसाकडे पाठ फिरवत शेतकर्यांनी कांदा, गहू, अशा पिकांसह केळी, डाळिंब आदी फळंपिकांना स्वीकारलं आहे. ऊस मिळविण्यासाठी साखर कारखान्यांची स्पर्धा सुरुच आहे.
तालुक्यातील ज्ञानेश्वर व मुळा या साखर कारखान्यासह दहा-बारा साखर कारखाने ऊस तालुक्यातून नेत आहेत. त्यात वरखेडच्या स्वामी समर्थ साखर कारखान्यानेही यंदा पहिलाच हंगाम सुरू केला आहे. पंचगंगा शुगरनेही पहिलाच ऊस गाळप हंगाम सुरू केला आहे. यंदा पाणीपातळी लवकरच खालावली आहे. ऊसलागवड करावी की नाही, या विचारात शेतकरी असतांनाच तालुक्यात काही प्रमाणात यंदा ऊसलागवडी झालेल्या असल्या तरी पुढच्या गळिताला तालुक्यातील कारखान्यांना फायदा होणार आहे. उसाची ओढाताण ही नित्याचीच बनली आहे.