Published on
:
03 Feb 2025, 12:00 am
Updated on
:
03 Feb 2025, 12:00 am
केंद्रीयअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचे बजेट सादर केले आणि मध्यमवर्गामध्ये सुखाची लहर पसरत गेली. आपण कमावतो कशासाठी, तर सरकारचा टॅक्स देण्यासाठी अशी भावना निर्माण झालेला आणि पंतप्रधान मोदी यांचा चाहता असलेला मध्यमवर्ग गेल्या काही वर्षांत निराशेत लोटला गेला होता. या मध्यमवर्गाला मोठाच दिलासा देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. बजेट जाहीर होताच मध्यमवर्गाने घरी गोडधोड करून दिवाळी साजरी केली असे दिसून येते.
बाकी सर्वसामान्य लोकांना बजेट फारसे कळत नसते, असे आपल्या लक्षात येईल. काय महागणार आणि काय स्वस्त होणार, एवढे फक्त आपण वाचत असतो. रुपया येणार कसा आणि जाणार कसा, हा केंद्र सरकारचा प्रश्न असतो. आपण आपले महिन्याभरात कमावलेले महिनाभर कसे पुरेल, यासाठी आपले बजेट खाली-वर करत असतो. या बजेटमध्ये सर्वात महत्त्वाचे काय झाले असेल, तर तरुण लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिकीकरणामुळे त्यांना भरपूर पगार मिळत असे आणि त्यातील सुमारे 30 ते 35 टक्के पगार त्यांना टॅक्स म्हणून द्यावा लागत असे. ते आता टळणार आहे असे दिसते. टॅक्स कमी करून सरकारची अपेक्षा जनतेकडून काय असेल असे तुम्हाला वाटते? तुमचा टॅक्स कापला नाही ना मग आता खर्च करा, भरपूर पैसे उधळा, देश-विदेशांना फिरायला जा, भरपूर हॉटेलिंग करा, एकंदरीत मजा करा आणि खर्च करा म्हणजे ते पैसे देशाच्या व्यवहारामध्ये फिरत राहतील आणि त्या माध्यमातून देशाची आर्थिक परिस्थिती सुधारेल असा हा काहीसा अंदाज आहे. नेमके काय होते ते बघावे लागेल. अंत्यविधी, दफनविधी हे मृत्यूनंतर केले जाणारे कर्तव्य असते. देवाघरी जाणार्या लोकांनासुद्धा जल्लोष करण्याची संधी दिली आहे. अंत्यविधी, दफन विधी आणि त्यासंदर्भात लागणारे सर्व सामान यावरचा जीएसटी काढून टाकलेला आहे. याचा अर्थ शेवटचा दिस गोड व्हावा या द़ृष्टीने त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले आहेत. आपल्या माघारी आपल्या मुलाबाळांना, नातेवाईकांना फारसा खर्च करावा लागणार नाही म्हणून देवाघरी जाणारा पण खूश आहे आणि मुलाबाळांना आणि नातेवाईकांना हा दिलासा आहे की, जाणार्या व्यक्तीवर आता होणारा खर्च कमी होणार आहे. एकाच वेळी दुःखी माणसांची कदर करणे आणि जे आधीच सुखात आहेत त्यांना अधिक सुख प्रदान करणे असे संमिश्र बजेट सादर झाल्यामुळे देशात सर्वत्र आनंदाची भावना आहे.
मध्यमवर्गाला दिलासा दिल्यामुळे हा वर्ग इथून पुढे अधिक चंगळवादी होणे देशाच्या हिताचे असणार आहे. कितीही मोठा ईएमआय असला, तरी लोक तो सहन करू शकतील अशी परिस्थिती केंद्राने निर्माण केली आहे. वाहनांची खरेदी वाढेल, कपडे, ड्रेस घेणे यात वाढ होईल, हॉटेलमध्ये जाऊन मनासारखे खाणे यात वाढ होईल. थोडक्यात, लोकांची चंगळ करून टाकलेली आहे आणि ही ज्या लोकांची चंगळ झाली आहे ते लोक पैसे वाचवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा ते पैसे खर्च करण्याच्या मागे लागतील आणि देश पुन्हा महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागेल असे काहीसे समीकरण निर्मलाआत्या यांनी जमवून आणलेले आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होवोत आणि देशाला उज्ज्वल असा भविष्यकाळ मिळो, यासाठी परमेश्वरचरणी आमची प्रार्थना!