Published on
:
25 Nov 2024, 11:46 pm
Updated on
:
25 Nov 2024, 11:46 pm
म्हसवड : विधानसभा निवडणुकीत म्हसवड मधून भाजपचे उमेदवार आ. जयकुमार गोरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर 6 हजार 335 मतांचे मोठे मताधिक्य मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. याबाबत प्रचार सभेत केलेले विधान खरे ठरवत इंजि. सुनील पोरे यांनी दावा केलेल्या 5 हजार 500 पेक्षा जास्त मताधिक्य देत शब्द खरा ठरवला.
आनंदीबाई हॉल येथील प्रचार सभेत इंजि. सुनील पोरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर विश्वास व्यक्त करत म्हसवडमधून जयकुमार गोरे यांना किमान 5 हजार 500 पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देऊ, असे विधान केले होते. हे विधान त्यांनी निकालानंतर अचूक ठरवले. आ. गोरे यांनी 10,807 मते मिळवली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी घार्गे यांना केवळ 4,472 मते मिळाली. निकाल जाहीर झाल्यानंतर सुनील पोरे यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधत म्हसवडमधील जनतेचा विश्वास आणि सर्वांची मेहनत पक्षाने घेतलेली धडपड यामुळेच हा विजय शक्य झाला. हा विजय म्हणजे लोकशाहीचा आणि विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याचे सांगितले. तसेच या विजयामुळे भाजप पक्षाला आगामी निवडणुकीसाठी बळ मिळाले आहे. विशेषतः म्हसवडसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघात ही कामगिरी पक्षासाठी एक प्रेरणादायी टप्पा ठरली आहे. जयकुमार गोरे यांचा विजय हा पक्षासाठी भविष्यातील राजकीय योजनांसाठी बळकटी मिळवून देणारा ठरणार आहे. म्हसवडमधील हा विजय लोकशाहीच्या उत्सवाचे प्रतीक असल्याचेही पोरे म्हणाले.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण...
सुनील पोरे यांच्या गणिताची अचूकता आणि जयकुमार गोरे यांचा विजय यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी विजय उत्सव साजरा करत पुढील राजकीय वाटचालीसाठी नव्या उमेदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.