पिवळ्या बाजूची परिघीय दृष्टी लाल रंगापेक्षा 1.24 पट जास्त असते. तो डोळ्यांना सहज दिसतो. त्यामुळेच स्कूलबस रंगविण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर केला जातो.
देशात महागाई वाढतच चालली असून त्याचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीयांना बसतो. या महिन्याच्या सुरूवातीपासून अर्था 1 फेब्रुवारीपासून रिक्षा-टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्यात आल्याने प्रवास महागला होता. त्यातच आता शाळेत जाण्याचा प्रवासही महागण्याची चिन्ह आहेत. कारण आता शालेय बसच्या अर्थात स्कूल बसच्या भाड्यातही तब्बल 18 टक्के वाढ करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार असल्याचे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने जाहीर केले आहे. त्यामुळे आपल्या चिमुकल्यांना शाळेच्या बसने पाठवणाऱ्या पालकांसाठी ही मोठी बातमी असून त्यांना आणखी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात सुमारे 40 हजार नोंदणीकृत स्कूल बस असून, त्यापैकी 8 हजार गाड्या तर मुंबईत आहेत. स्कूलबसच्या भाड्यात वाढ झाल्याने आता पालकांच्या खर्चात वाढ होणार आहे.
का होत्ये दरवाढ ?
स्कूलबसच्या दरात थेट 18 टक्के दरवाढ करण्यामागचे कारण काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर सध्या वाहनांच्या सुट्या भागांच्या किमती वाढल्या आहेत. इंधन दरातही वाढ झाली आहे. पार्किंग शुल्क दुप्पट झाल्याने बस चालक-मालकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे बसची देखभाल करणे, दुरुस्ती खर्च यामध्ये वर्षाला 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.
तसेच शाळेच्या बसमधून जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जीपीएस यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर उपकरणे बसवणे अनिवार्य करण्यात आलं आहे. या खर्चाचा भारही बस चालक-मालकांवर येतो. त्यामुळे स्कूल बसच्या भाड्यात 1 एप्रिलपासून 18 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने जाहीर केलाय. या दरवाढीची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह परिवहन विभागाला आणि शाळांना देण्यात आल्याचे समजते.