एका पक्षाच्या उमेदवाराचे स्टेटस ठेवल्याच्या रागातून कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील मिर्झापूर परिसरात शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात चौघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिर्झापूर येथील पंढरीनाथ संपत वलवे हे शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते.
यावेळी शेताच्या शेजारी असलेला पाईपवरून विजय ज्ञानेश्वर वलवे याची बोलेरो (क्रमांक एम एच 14 ए सी 8736) गाडी गेल्याने पाईप निघाला होता. गाडी पाईपवरून का घातली, असे पंढरीनाथ याने विचारले असता, गाडीतून विजय वलवे, गीताराम सयाजी वलवे, राहुल चंद्रभान वलवे हे खाली उतरले. विजय याने पंढरीनाथ यांचा शर्ट पकडून तु आमच्या विरोधात काम करतो, भाजपचे स्टेट्स ठेवतो का ? असे म्हणून मारहाण केली. गीताराम व राहुल यांनी गाडीतील काठ्या व रॉड आणून पंढरीनाथ वलवे यांना मारहाण केली.