Published on
:
04 Feb 2025, 3:14 pm
Updated on
:
04 Feb 2025, 3:14 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वीडनमधील ओरेब्रो शहरातील एका शाळेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वीडनमधील प्रौढ शिक्षण केंद्रात पाच जणांवर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे लोकांना शाळेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या हल्याप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली आहे की नाही याबाबत पोलिसांकडून अध्याप माहिती मिळालेली नाही. हल्ल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या इमारतींमध्ये आश्रय देण्यात आला आहे.
हिंसाचाराचा अहवाल खूपच गंभीर : न्यायमंत्री गुन्नार स्ट्रॉमर
या हल्ल्यानंतर स्वीडनचे न्यायमंत्री गुन्नार स्ट्रॉमर यांनी एका स्वीडिश वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, 'ओरेब्रोमधील हिंसाचाराचे अहवाल खूपच गंभीर आहेत. पोलीस ज्या ठिकाणी घटना घडली त्या घटनास्थळी उपस्थित आहेत. पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. सरकारही पोलिसांच्या संपर्कात असून घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
गुन्हेगाराने जीवन संपवल्याचा स्थानिक वृत्तसंस्थेचा दावा
या घटनेनंतर गुन्हेगाराने जागीच आत्महत्या केल्याचा दावा स्वीडिश वृत्तसंस्था 'टीटी'ने केला आहे. मात्र, पोलिसांनी त्याला दुजोरा दिलेला नाही. या हल्ल्यामागील कारण काय आहे हे अध्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस घटनेचा तपास करत आहेत.