Published on
:
15 Nov 2024, 11:35 pm
Updated on
:
15 Nov 2024, 11:35 pm
वॉशिंग्टन : अनेक भारतीय मसाले आरोग्यासाठी गुणकारी असतात. त्यामध्येच हळदीचा समावेश होतो. हळदीमधील ‘क्युरक्युमिन’ हा घटक कर्करोगावर गुणकारी असल्याचे अनेक संशोधनांमधून दिसून आलेले आहे. कर्करोग म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ. हळदीचा अर्क हा कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी उपयुक्त असतो, असेही एका संशोधनात दिसून आले होते.
या संशोधनानुसार हळदीत क्युरक्युमिन हे संयुग असते व ते वेगळे काढून त्याचा वापर कर्करोगग्रस्त पेशी मारण्यासाठी करता येतो. आतापर्यंत क्युरक्युमिन हे गुणकारी असल्याचे माहीत असूनही त्याचा परिणामकारक वापर करता येत नव्हता, असे इलिनॉइस विद्यापीठाचे प्राध्यापक दीपंजन पान यांनी म्हटले होते. जेव्हा तुम्ही औषध देता तेव्हा ते पाण्यात विरघळणारे असले पाहिजे, अन्यथा ते रक्तप्रवाहात मिसळू शकत नाही, असे संशोधक संतोष मिश्रा यांनी सांगितले. उटाह विद्यापीठातील संशोधकांसह काहींनी प्लॅटिनमच्या मदतीने क्युरक्युमिनची विद्राव्यता वाढवली व त्याचा वापर केला असता ते द्रावण मेलानोमा व स्तनाच्या कर्करोगासह इतर कर्करोगांवर शंभरपट जास्त प्रभावी दिसून आले. क्युरक्युमिन या संयुगामुळे स्टॅट 3 या मार्गिकेची फॉस्फोरिलेशन कमी होऊन कर्करोगाच्या पेशींची वाढ मंदावते. क्युरक्युमिन व प्लॅटिनम यांचा एकत्र वापर केल्याने डीएनएचे तुकडे होऊन कर्करोग पेशी मारल्या जातात. कर्करोग उपचारात औषधांची विद्राव्यता ही मोठी अडचण असून, तो अडथळा दूर करणे आवश्यक आहे. कर्करोगाच्या मूलपेशी मारणेही या तंत्राने शक्य असून, त्यामुळे हा रोग परत डोके वर काढणार नाही अशी व्यवस्था करता येईल, असा दावा प्रा. पान यांनी केलेला आहे.