पहिल्याच दिवशी 150 धावांत हिंदुस्थानी संघ गारद करून यजमान ऑस्ट्रेलियाने कसोटीवर केलेली पकड आधी जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱयाने, तर नंतर यशस्वी जैसवाल व विराट कोहलीच्या शतकांनी सैल केली होती. आज चौथ्या दिवशी त्यांच्या कामगिरीवर मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदरने कळस चढवला. जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी ऑस्ट्रेलियावर 4-0 ने मात करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत हिंदुस्थानने आज तीन लाजिरवाण्या पराभवांनंतर पुन्हा एकदा विजयपर्व सुरू केले. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियन भूमीवरील आपला सर्वोच्च विजय नोंदवताना यजमानांचा 295 धावांनी पराभव केला.
काल हिंदुस्थानने तिसऱया दिवसाचा सनसनाटी शेवट करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी दुर्दशा करीत आपला विजय निश्चित केला होता, पण या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हिंदुस्थानला तब्बल दोन सत्र ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करण्यासाठी खर्च करावे लागले. खऱया अर्थाने ऑस्ट्रेलियन संघ कालच हरला होता. आज फक्त औपचारिकता पूर्ण करण्यात आली. ट्रव्हिस हेडची 101 चेंडूंतील 89 धावांची घणाघाती खेळी वगळता कुणी फार काळ हिंदुस्थानी आक्रमणापुढे उभा राहू शकला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केवळ आपल्या पराभवाचे अंतर कमी करण्यातच धन्यता मानली.
बुमराहच ठरला हीरो
हिंदुस्थानच्या विजयाचा शिल्पकार हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराहच ठरला. त्याने पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन डावाला दिलेले तडाखेच विजयाचा पाया ठरला. त्याने पहिल्या डावात 30 धावांत अर्धा संघ गारद केला, तर दुसऱया डावात 42 धावांत 3 विकेट घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीची दाणादाण उडवली. त्याने 72 धावांत 8 विकेट टिपत सामनावीर पुरस्कारही पटकावला. सिराजनेही सामन्यात 5, तर पदार्पणवीर हर्षित राणाने 4 विकेट घेत आपलीही जबाबदारी चोख पार पाडली.
हेड आला धावून
उपाहारानंतर हेडने मिचेल मार्शच्या साथीने हिंदुस्थानी गोलंदाजाला अक्षरशः पह्डून काढले. हेडचा झंझावात पाहून तो संघाचा पराभव लांबवणार हे स्पष्ट दिसत होते. दोघांनी धावसंख्या 161 वर नेली. त्यामुळे हिंदुस्थानी गोलंदाजांनीही डोळे मोठे केले होते. तेव्हा बुमराह पुन्हा एकदा जोडी पह्डण्यात यशस्वी ठरला. त्याने हेडची खेळ संपवण्याची कमाल केली. त्यानंतर अॅलेक्स पॅरीने शेवटची धडपड केली. वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव अडीचशेच्या आत संपवण्यात आपलाही हातभार लावला, पण हिंदुस्थानला यासाठी तिसऱया सत्राची वाट पाहावी लागली. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 238 धावांत संपुष्टात आणला.
स्मिथ-ख्वाजाने पुन्हा निराश केले
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा एकही फलंदाज खेळपट्टीवर उभा राहिला नव्हता. त्यामुळे कालच्या नाबाद उस्मान ख्वाजा आणि स्टीव्हन स्मिथकडून खूप अपेक्षा होत्या, पण दोघांनीही घोर निराशा केली. मोहम्मद सिराजने दिवसाच्या आपल्या पहिल्याच षटकात ख्वाजाला बाद करून दिवसाचा जोरदार प्रारंभ केला. पुढे स्मिथ आणि ट्रव्हिस हेडने अर्धशतकी भागी रचत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला, पण सिराजने पुन्हा एक यश मिळवत स्मिथचा अडसर दूर केला. उपाहाराआधीच 79 धावांत अर्धा डाव कोसळल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित झाला होता. या दोन धक्क्यांनंतर ऑस्ट्रेलियन डावाला फक्त हेडकडून अपेक्षा होती. त्याने ती पूर्ण करताना काही काळ संघर्ष केला आणि संघाचा पराभव काहीसा लांबवला.
जैसवालने सर्वोत्तम खेळ केला
जसप्रीत बुमराहने हिंदुस्थानच्या विजयाचे श्रेय पूर्ण संघाला दिले, पण त्याचबरोबर त्याने यशस्वी जैसवालचेही तोंडभरून काwतुक केले. त्याची 161 धावांची खेळी त्याच्या चार शतकांमधील सर्वोत्तम खेळी असल्याचेही तो म्हणाला. जैसवालने या शतकी आधी पदार्पणातच 171 आणि त्यानंतर दोन द्विशतकी खेळ्या केल्या आहेत. या तिन्ही कसोटींत हिंदुस्थान विजयी ठरलाच होता आणि आजही त्याचे शतक संघाला विजय मिळवून देणारे ठरले. पर्थसारख्या वेगवान खेळपट्टीवर यशस्वी ज्या आत्मविश्वासाने खेळला त्याला तोड नाही. त्याने उसळत्या आणि स्विंग चेंडूंना खेळताना संयमी फलंदाजी केली. पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला असला तरी दुसऱया डावातील खेळी ही त्याची कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी असल्याचे माझे स्पष्ट मत असल्याचे बुमराह म्हणाला. त्याला गोलंदाजांवर तुटून पडणे आवडते, पण तो संयमानेही खेळला. त्याने अनेक चेंडूही सोडले. तसेच विराटचा खेळ पाहून तो फॉर्मशी झुंजतोय असे एकदाही वाटले नाही, असे बुमराहने विराटचे काwतुक केले.
आम्ही पहिल्या डावातच हरलो
पहिल्या डावात 104 धावांत आमचा संघ आटोपला तेथेच आम्ही कसोटी हरलो. इतका वाईट खेळ केल्यानंतर आम्हाला सामन्यात पुनरागमन करण्याची हिंदुस्थानने एकही संधी दिली नाही. हिंदुस्थानला गुंडाळल्यानंतर आमची झालेली अवस्था फारच निराशाजनक होती. आम्ही सामन्याआधी चांगली तयारी केली होती, पण आम्ही केलेली तयारी प्रत्यक्षात मैदानात दिसली नाही. आम्हाला जसा हवा होता तसा आमचा खेळ होऊ शकला नाही. तयारी आणि सामना यात जमीन अस्मानाचे अंतर असते. आता दहा दिवसांची विश्रांती आहे आणि आम्ही अॅडलेडमध्ये आमच्या कामगिरीत नक्कीच सुधारणा करून पुनरागमन करू असा विश्वास ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने व्यक्त केला. आम्हालाही खेळात पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. हिंदुस्थानला 150 धावांत गुंडाळणे ही मोठी गोष्ट होती, पण आम्हाला मिळालेल्या संधीचे आम्ही सोने करू शकलो नाहीत. पहिल्या दिवशी आम्ही फलंदाजीत अपयशी ठरलो हेच आमच्यासाठी घातक ठरले. आमचा संघ नक्कीच चांगला आहे आणि अॅडलेडवर आम्ही पर्थचे अपयश विसरून पुन्हा नव्याने मैदानात उतरू व आमचा सर्वोत्तम खेळ दाखवू, असेही कमिन्स विश्वासाने म्हणाला.