गेल्या दोन आठवडय़ांपासून ज्या गोष्टीबाबत साशंकता व्यक्त केली जात होती ती अखेर खरी ठरली आहे. बाबा झालेला रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी पर्थला जाणार नसल्याचे अखेर बीसीसीआयने कळवले आहे. हिंदुस्थानी संघ पर्थवर सेनापतीविना खेळत असला तरी जसप्रीत बुमरा हे वेगवान अस्त्र संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत हिंदुस्थानी संघ एकामागोमाग पराभवाचे धक्के सहन करत असताना कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव बॉर्डर-गावसकर करंडकातील (बॉगाक) पर्थवर खेळल्या जाणाऱया पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता असल्याचे समोर आले होते. गेल्या आठवडय़ात हिंदुस्थानचा संघ रोहितविना ऑस्ट्रेलियात दाखल झाला.
तेव्हाही रोहितबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. दोन दिवसांपूर्वीच रोहितच्या घरात आनंदाची बातमी आली. त्याला पुत्ररत्नाचा लाभ झाला. 15 नोव्हेंबरला रोहित बाबा झाला या आनंदाच्या वृत्तानंतर तो पर्थ कसोटीसाठी दोन-तीन दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र तो 30 नोव्हेंबरला कॅनबेरा येथे पंतप्रधान इलेव्हनविरुद्ध होणाऱया दोन दिवसीय लढतीसाठी ऑस्ट्रेलियात दाखल होणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून कळले आहे. पर्थ कसोटीनंतर दुसरी कसोटी 6 डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरू होणार असून या कसोटीसाठी बुमराकडून संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा रोहितच्या हाती असेल.
बुमराकडे पुन्हा नेतृत्व
कोविड काळात 2021-22च्या मोसमात इंग्लंडविरुद्ध दोन टप्प्यांत झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचव्या कसोटीत जसप्रीत बुमराकडे संघाचे तात्पुरते नेतृत्व सोपविण्यात आले होते. मालिकेत 2-1ने आघाडीवर असलेल्या हिंदुस्थानला 7 विकेटने नमवत मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली होती. त्यानंतर पुन्हा एकदा रोहितच्या अनुपस्थितीत तो संघाचे कर्णधार पद भूषवणार आहे.
सलामीची धाकधूक वाढली
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हिंदुस्थानचा सलामीचा प्रश्न अधिकच बिकट झाला होता. म्हणून सलामीसाठी के.एल. राहुल, अभिमन्यू ईश्वरन यांच्यापैकी एकाच्या निवडीची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यात शुबमन गिलच्या अंगठय़ाला झालेल्या फ्रॅक्चरमुळे तोसुद्धा पर्थ कसोटीला मुकण्याची दाट शक्यता आहे. अशा स्थितीत राहुल आणि अभिमन्यू या दोघांचेही भाग्य फळफळणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळू लागले आहे. दोन दिवसांपासून हिंदुस्थानच्या आघाडीच्या फलंदाजांच्या दुखापतीच्या वृत्तांमुळे संघाची स्थिती कसोटीपूर्वीच नाजूक झाली आहे. एकीकडे राहुललाही दुखापत झाल्याचे समोर आले होते. विराट कोहलीही अनफीट असल्याचे बोलले जात होते. मात्र रविवारी सरावासाठी विराटची उपस्थिती पाहून थोडीशी धाकधूक कमी झाली आहे. सध्या दोन फलंदाज कमी झाल्यामुळे संघाचे टेन्शन वाढलेय. ते तूर्तास कमी होण्याची शक्यता कमी आहे.