महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी घेतली जाणार आहे. अशातच पूर्वपरीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका पुरवतो, त्यासाठी 40 लाख रुपये दे, असे आमिष दाखवण्याचे प्रकार पुण्यात घडले आहेत. दोन ऑडिओ क्लिपमधील संवाद एका वृत्तवाहिनीच्या हाती लागला असून विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
‘मी रोहन कन्सल्टन्सी नागपूरमधून बोलत आहे. आपले बोलणे झाल्याप्रमाणे 2 फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे. त्याचा पेपर आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. त्यासाठी व्हॉट्सअॅप काॅलवर मीटिंग करावी लागेल,’ असे एक महिला विद्यार्थ्याला सांगते.
तसेच याच विद्यार्थ्याला आणखी एक पह्न आला. त्यात त्याला 2 फेब्रुवारी आधी पेपर उपलब्ध करतो त्यासाठी 40 लाख रुपये द्यावे लागतील अशी ऑफर देण्यात आली. विश्वास नसल्यास या परीक्षेला एकही रुपया नाही दिला तरी चालेल. केवळ ओरिजनल कागदपत्रे जमा करावी लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेलाही प्रश्नपत्रिका दिली जाईल, असे पुरुषाच्या आवाजातील संभाषण रेकाॅर्ड झाले आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.