Published on
:
04 Feb 2025, 12:42 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:42 am
सरूड : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून रत्नागिरीकडे विदेशी मद्य (लिकर बॉक्स) वाहून नेणार्या ट्रकचा वारूळ (ता. शाहूवाडी) येथे रस्त्याकडेला अपघात होऊन ट्रकमधील 87 लाख 77 हजारांचे मद्य प्रवासी, नागरिकांनी लुटल्याचा बनाव करणार्या ट्रकचालकाचे शाहूवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासांतच पितळ उघडे पाडले. ही नाट्यमय घटना 29 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान घडली. गाझियाबाद येथील आर. एस. लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीच्या व्यवस्थापकाने शाहूवाडी पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष दिलेल्या फिर्यादीनंतर संशयित ट्रकचालक वसिम सत्तार आत्तार (रा. नाशिक) व त्याचा साथीदार क्लीनर सोनू ऊर्फ संदीप मोहन डुग्गल (रा. अहमदनगर) या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांनी दिली.
व्यवस्थापक सर्वेशकुमार जयनारायण मिश्रा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आर. एस. लॉजिस्टिक मार्फत दिंडोरी-नाशिक येथील परनॉड रिकाजी इंडिया प्रा. लि. या लिकर फॅक्टरीचे 1509 लिकर बॉक्स (किंमत 1 कोटी 16 लाख 55 हजार 536 रु.) हे विदेशी मद्य ट्रकमध्ये भरून रत्नागिरी येथील काश्मीरा ट्रेडर्सकडे पोहोच करण्यासाठी जात होते. ट्रकचालक वसिम आत्तार व त्याचा साथीदार क्लीनर सोनू ऊर्फ संदीप डुग्गल या दोघांनी संगनमताने ट्रकमधील 1188 लिकर बॉक्स (किंमत 87 लाख 76 हजार 736) परस्पर गायब केले. यावेळी त्यांनी ट्रकशी संलग्नित जीपीएस ट्रॅकर प्रणालीही तत्काळ बंद केली.
दरम्यान, शाहूवाडी तालुक्यातील वारूळ या गावाजवळ रस्त्याकडेला ट्रक घसरून अपघात झाल्याचे भासवून ट्रकमधील विदेशी मद्याचे 1188 लिकर बॉक्स प्रवासी, नागरिकांनी लुटून नेल्याचा बनाव करून ड्रायव्हर आत्तार आणि क्लीनर डुग्गल या दोघांनी शाहूवाडी पोलिसांत तशी तक्रार दिली. मात्र शाहूवाडी पोलिसांनी ट्रान्स्पोर्ट कंपनीचा गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथील व्यवस्थापक मिश्रा यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची खातरजमा केली. यावेळी जीपीएस प्रणाली बंद असल्याचे दिसून आले. ड्रायव्हर आणि क्लीनर या दोघांचे संशयास्पद वर्तन लक्षात येताच पोलिसांनी दोघांकडे केलेल्या चौकशीत या नाट्यमय गुन्ह्याची उकल झाली. यानंतर पोलिसांनी पाचारण केलेल्या सर्वेशकुमार मिश्रा यांनी रविवारी रात्री शाहूवाडी पोलिस ठाण्यात येऊन चोरीला गेलेल्या मालाबाबत तक्रार दिली. ट्रकचालक वसिम आत्तार व त्याचा साथीदार क्लीनर सोनू ऊर्फ संदीप मोहन डुग्गल या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ट्रकचालक वसिम आत्तार याच्या विरोधात याआधीही नाशिक जिल्ह्यातील भद्रकाली पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रोकडे हे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.