देवळाली : मतदारसंघात प्रचार दौऱ्याप्रसंगी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. राजश्री अहिरराव यांचे स्वागत करताना ग्रामस्थ.
Published on
:
15 Nov 2024, 6:22 am
Updated on
:
15 Nov 2024, 6:22 am
नाशिक : देवळाली मतदारसंघाच्या सर्वंकष विकासासाठी परिवर्तन आवश्यक असून, शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. राजश्री अहिरराव यांच्या माध्यमातून सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. उच्च विद्याविभूषित व विकासाचे व्हिजन असलेल्या अहिरराव यांच्या अनुभवाचा फायदा मतदारसंघाच्या विकासाला होईल, अशी भावना मतदार व्यक्त करत आहेत. आपल्या हक्काच्या तहसीलदारताई डॉ. अहिरराव याच विकासाचा नवा आधार आहेत. त्यामुळे देवळालीत यंदा शिवसेना धनुष्यबाणाला पाठिंबा देण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. राजश्री अहिरराव या मतदारसंघाचा झंझावाती प्रचार दौरा करत आहेत. या दौऱ्याप्रसंगी गावागावांमधून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अहिरराव यांनी गुरुवारी (दि. १४) विहितगाव, सिन्नर फाटा, गोरेवाडी, अश्विननगर, चेहेडी गाव, चेेहेडी पंपिंग, संगमेश्वर मंदिर, मराठा कॉलनी, गाडेकर मळा, मालधक्का रोड, सौभाग्यनगर, लॅम रोड येथे प्रचार दौरा करत मतदारांशी सुसंवाद साधला.
तहसीलदारताई या मागील 10 वर्षांपासून मतदारसंघाला परिचित असून, त्यांनी विविध शासकीय शिबिरांच्या माध्यमातून सामान्यांचे प्रश्न सोडविले आहेत. नाशिक तहसीलदार असताना त्यांनी मतदारसंघातील विविध प्रश्नांची जाण करून घेतली. त्यांच्या या प्रशासकीय अनुभवातून मतदारसंघातील विकासाला बळ लाभल्याने त्यांना विजयी करण्याचा निर्धार मतदारांनी केलेला आहे. ग्रामस्थांचा विश्वास आणि प्रेम पाहून डॉ. अहिरराव भारावल्याचे दिसून आले. या भेटीने गावागावांत विजयाची नवी उमेद जागवली आहे असे मत डॉ. अहिरराव यांनी व्यक्त केले.
प्रचार दाैऱ्याप्रसंगी महिलांकडून औक्षण करून स्वागत करण्यात आले. गावागावांमध्ये हातात भगवा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणांनी तरुणाईचा सळसळता उत्साह विजयाचे संकेत देत होता. 'समृद्ध होणार आपले गाव, निवडून येणार अहिरराव' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी अहिरराव यांनी मतदारांकडून विकासासंबंधी सूचनाही जाणून घेतल्या.