जिल्ह्यातील १५ मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला बुधवारी(दि.२०) शांततेत सुरूवात झाली. सकाळी सर्वच मतदारसंघांमधील मतदान केंद्रांमध्ये उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत ‘मॉक पॉल’ घेण्यात आला. त्यानंतर ७ वाजता प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सकाळी आठ वाजेपर्यंत मतदान केंद्रांसमोर मतदारांची बऱ्यापैकी गर्दी जमल्याचे चित्र होते. मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृध्द मतदारांनी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे घरातील दिव्यांग तसेच ज्येष्ठांना मतदान केंद्रांपर्यंत ने-आण करणे सुलभ बनले होते. मतदान कर्मचारी तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींकडूनही ज्येष्ठांना मतदानासाठी मदत केली गेली.
मतदान केंद्रांत मोबाईल नेण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांमध्ये पोलिस आणि मोबाईलधारी मतदारांमध्ये खटके उडत असल्याचे चित्र होते. यंदाही मोठ्या संख्येने महिला मतदार मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र होते. नवमतदारांमधील उत्साहही ही वाखाणण्याजोगा होता. सकाळी ९ वाजेपर्यंत जिल्ह्यात मालेगाव मध्य मतदारसंघात सर्वाधिक ९.९८ टक्क मतदान झाले तर देवळालीत सर्वात कमी ४.४२ टक्के मतदान झाले होते. नांदगाव-४.९२, मालेगाव बाह्य- ६,१३, बागलाण- ६.११, कळवण- ८.५, चांदवड- ६.४९, येवला- ६.५८, सिन्नर- ८.०९, निफाड- ५.४, दिंडोरी - ९.७१, नाशिक पूर्व - ६.४३, नाशिक मध्य- ७.५, नाशिक पश्चिम- ६.२५ तर इगतपुरीत ६.८५ टक्के मतदान झाले होते. पुढील दोन तासात मतदानाचा टक्का वाढला. नांदगावमध्ये १६.४६, मालेगाव मध्य- २२.७६, मालेगाव बाह्य- १५.९४, बागलाण- १८.२३, कळवण-१८,२४, चांदवड- २१.३, येवला- २०.९२, सिन्नर- २१.२, निफाड- १७.६४, दिंडोरी- २६,४१, नाशिक पूर्व- १३.९, नाशिक मध्य-१८.४२, नाशिक पश्चिम-१६.३२, देवळाली-१५.०१ तर इगतपुरी-२०.४३ टक्के मतदान झाले.