Published on
:
23 Nov 2024, 11:44 pm
Updated on
:
23 Nov 2024, 11:44 pm
प्रा. प्रकाश पवार, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक निकालातून नवीन पक्ष पद्धती उदयास आली. कारण, भाजपला 25 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तसेच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस या तिन्ही नेत्यांनी घडवलेल्या पक्ष पद्धतींचा र्हास घडून आला. या तीन पक्षांना केवळ 23 टक्के मते मिळाली आहेत. म्हणजेच थोडक्यात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात भाजप वर्चस्वशाली पद्धत उदयास आली आहे.
सत्ता स्पर्धा आणि सत्ता संबंध यांची भाजपने पुनर्रचना केली. कारण, भाजपला 25 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली आहेत. इतर पक्षांची मते त्यांच्या तुलनेत फारच कमी आहेत. 10-12 टक्के इतकी मते काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट, शिवसेना- एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार, उद्धव ठाकरे-शिवसेना या पक्षांना मिळाली आहेत. केवळ 10 ते 12 टक्क्यांच्या दरम्यान या तीन पक्षांना मते मिळाली आहेत. भाजपच्या मतांची टक्केवारी या प्रत्येक पक्षापेक्षा दुपटीपेक्षाही अधिक आहे. यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी हे भाजपचे स्थान तर शिल्लक राहिलेच, यासोबत भाजपने या पद्धतीने वर्चस्वशाली पक्ष या प्रकाराकडे वाटचाल केली. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून गेल्या दोन निवडणुकांत पुढे आली. यानंतर तिसर्या निवडणुकीतही भाजप पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून उदयास आला आहे. 2014 व 2019 च्या तुलनेत या पक्षाने 2024 मध्ये अधिक जागा आणि मते मिळविली आहेत. यामुळे भाजप एका अर्थाने सर्वच पक्षांमध्ये अधिक वर्चस्वशाली झाला आहे. 90 च्या दशकात हा पक्ष शिवसेना पक्षाच्या आधारे विस्तारत होता. 21 व्या शतकाच्या तिसर्या दशकात मात्र भाजपने स्थिरस्थावर सर्व पक्ष पद्धतींमध्ये मोडतोड करून नवीन पक्ष पद्धती उदयास आणण्यासाठी गेल्या दहा वर्षांत प्रयत्न केले होते. ग्रामीण आणि शहरी भागात भाजप यासाठी प्रयत्न करत होती. यामुळे भाजपचे उमेदवार ग्रामीण भागात आणि शहरी भागातही निवडून आले. मुख्य मुद्दा म्हणजे भाजपविरोधातील असंतोष द्रुतगतीने निवळत गेला. जातीच्या राजकारणाला मागे टाकून हिंदुत्व राजकारण घडवण्यात भाजपला यश आले. हिंदुत्वाचे चार गट होते. भाजपचे संघावर आधारलेले हिंदुत्व, सावरकरवादी हिंदुत्व, एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्व, अजित पवारांचे हिंदुत्व या गटांमध्ये मतांची अदलाबदली त्यांनी घडवून आणली. ही प्रक्रिया आश्चर्यचकित करणारी वाटत असली, तरी या प्रक्रियेच्या मुळाशी गटांना जोडून घेण्याची क्षमता भाजपने दाखविलेली दिसते. विविध गटांचे सूत्रसंचालन आणि विविध गटांमध्ये समन्वय साधण्याची प्रक्रिया भाजपने केली. गटागटांतील खुली स्पर्धा सरते शेवटी भाजपने त्यांना अनुकूल करून घेतली.
दोन्हीही शिवसेनांची मिळून 23 टक्के मते दिसतात. उद्धव ठाकरे (11 टक्के) आणि एकनाथ शिंदे (13 टक्के) यांच्या मतांची टक्केवारी 23 टक्के या निवडणुकीत दिसते. विशेषतः महाराष्ट्रात नवीन पक्ष पद्धत निर्माण करण्याच्या मार्गातील एक अडथळा उद्धव ठाकरे हे होते. उद्धव यांच्या नेतृत्वापेक्षा त्यांच्याकडील हिंदुत्व विचार हा भाजपसाठी खूप अडचणीचा मुद्दा होता. भाजपने उद्धव यांच्याकडील हिंदुत्वाचा मुद्दा कौशल्याने या विधानसभा निवडणुकीत आणि याआधी अडीच वर्षे हाताळलेला दिसतो.
भाजपने शिवसेना पक्षातून शिंदे गटाला वेगळे केले म्हणजे त्यांनी हिंदुत्वाला आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसेना पक्ष नेमका कोणाचा, हा एक यक्षप्रश्न गेल्या अडीच-तीन वर्षांमध्ये निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी उद्धव यांचे नेतृत्व मागे टाकून मुख्य शिवसेनेवर दावा केला होता. विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या पक्षाला उद्धव यांच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा आणि मतांची टक्केवारी मिळाली आहे. यामुळे जागा, मते आणि विविध गटांना त्यांच्या बाजूला खेचून आणण्यात शिंदे यशस्वी झाले. या प्रक्रियेमध्ये त्यांनी उद्धव यांच्याकडे हिंदुत्व स्वतःकडे खेचून घेतले. यामुळे शिंदे यांची शिवसेना ही प्रभावी ठरली आहे; पण यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रादेशिक हिंदुत्ववादी पक्ष उद्धव यांचा हातून सुटत गेला. मराठा आरक्षणाचे समर्थक, हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आणि मराठ्यांमधील हिंदुत्वाचे पाठीराखे अशी शिंदे यांनी स्वतःची प्रतिमा नव्याने निर्माण केली. उद्धव यांच्या पुढे शिंदे गेले, याचे मुख्य कारण या तीन गोष्टींमध्ये दिसते. ही प्रक्रिया शिंदे यांनी राबविली. अमित शहा यांनी ही प्रक्रिया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घडवली. त्यांनी शिंदे यांच्या मार्फत महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी प्रादेशिक पक्षांची मते भाजपकडे वळवली.
भाजपच्या पुढे राज्यात नवीन पक्ष पद्धती उदयास येण्यातील दुसरा अडथळा शरद पवार आहेत. हे सूत्र निश्चित देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांनी यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वासंदर्भात भाजप नवनवीन पर्याय शोधत होती. या निवडणुकीत त्यांनी अजित पवार हा घटक वापरला. भाजपने अजित पवार हा पर्याय निवडल्यामुळे दोन गोष्टी घडल्या. एक तर शरद पवारांच्या नेतृत्वाला रोखण्यात यश आले. दुसरे म्हणजे, शरद पवार राबवित असलेले यशवंतराव प्रारूप राजकारणाच्या क्षेत्रातून बाजूला काढण्यासाठी या रणनीतीचा कौशल्याने वापर केला गेला. हे सुमारे 20 वर्षांपासून घडत आलेले आहे. 2004 पासून अजित पवार आणि शरद पवार असे राजकारणाचे ध्रुवीकरण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत होते. 2009 नंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये तीव्र मतभेद सत्तासंबंध आणि सत्तेसाठीच्या व्यूहरचनेसंदर्भात निर्माण झाले होते. अजित पवार हे मुख्यमंत्रिपदासाठी पक्षांतर्गत स्पर्धा करत होते. यातून अजित पवार हे शरद पवारांच्या विरोधात गेल्या दहा वर्षांत गेले होते. त्यांचे फडणवीस यांच्यासबोत नवीन सत्ता संबंध निर्माण झाले. अजित पवार यांनी फडणवीस यांच्याकडील सत्तेसोबत जुळवून घेतले होते. अजित पवार यांनी फडणवीस यांच्याशी जुळवून घेणे म्हणजे त्यांनी हिंदुत्व आणि विकास या भाजपच्या विचार प्रणालीशी जुळवून घेणे होते. यामुळे अजित पवार हे यशवंतराव चव्हाण प्रारूप आणि शरद पवारांच्या राजकारणापासून वेगळ्या मार्गाने जात आहेत, हे स्पष्टपणे गेल्या दहा वर्षांत घडत होते. फडणवीस आणि भाजपने या मार्गाने महाराष्ट्राच्या राजकारणातील यशवंतराव चव्हाण प्रारूप आणि शरद पवारांच्या राजकारणाची सर्वात मोठी पडझड केली आहे. यामुळे शरद पवारांच्या पक्षाला अजित पवारांच्या तुलनेत दोन टक्के मते अधिक मिळाली; पण त्या मतांचा निवडणूक जिंकण्यासाठी उपयोग झाला नाही. उलट भाजपने अजित पवारांना भाजपकडील मते दिली. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाची मतांची टक्केवारी कमी असताना जास्त उमेदवार निवडून आले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत जेवढी यशवंतराव चव्हाण प्रारूपाची पडझड झाली नव्हती, त्याच्या दुप्पट-तिप्पट पडझड यशवंतराव चव्हाण प्रारूपाची झाली. यामुळे अजित पवारांनी सरतेशेवटी यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणारा गट भाजपच्या सामाजिक समरसता या राजकारणाशी जोडून घेतला. ही या निवडणुकीतील सर्वात वेगळी व राजकारणाला नवीन वळण देणारी राजकीय प्रक्रिया घडलेली आहे. भाजपने विविध आघाड्यांवर रणनीती आखली होती. लाडकी बहीण ही एक रणनीती होती.
या रणनीतीचा फायदा भाजपला पक्ष पद्धती नवीन प्रस्थापित करण्यासाठी झाला. महिलांच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करण्याचा काँग्रेस, उद्धव ठाकरे शिवसेना गट यांचा कल सातत्याने राहिला होता. शरद पवार महिलांच्या राजकारणाला वाव देत होते; परंतु त्यांना निर्णय संधी मात्र देता आली नव्हती. ही पोकळी हेरून भाजपने महिलांना योजनेच्या मार्फत राजकारणाशी जोडून घेतले; परंतु केवळ या एकाच गोष्टीमुळे महाराष्ट्राची पक्ष पद्धती बदलली नाही. महाराष्ट्रातील पक्ष पद्धती बदलण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट तसेच वेगवेगळ्या समाजांनी भाजपशी जुळवून घेणे असे विविध घटक कारणीभूत ठरले आहेत.