Mumbai Air Pollution | मुंबईची हवा मॅरेथॉनला धोकादायक !file photo
Published on
:
18 Jan 2025, 4:29 am
Updated on
:
18 Jan 2025, 4:29 am
मुंबई : रविवारी होणाऱ्या मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईतील हवेची चाचणी करण्यात आली. यावेळी हवेतील पीएम २.५ या घातक सूक्ष्मकणांचे प्रमाण सुरक्षित मयदिपेक्षा अधिक आढळले. त्यामुळे रविवारी सकाळी मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
रविवारी पहाटेपासून मॅरेथॉन सुरू होणार असून त्याच्या ४८ तास आधी आवाज फाऊंडेशनने सिटिझन्स सायन्स उपक्रमांतर्गत हवेतील प्रदूषणाची पातळी मोजली. सेन्सर बेस्ड मॉनिटरच्या सहाय्याने हवेतील पीएम २.५ या घातक सूक्ष्मकणांचे प्रमाण मोजण्यात आले. सकाळी ५ ते ८.२७ वाजेपर्यंत मॅरेथॉन होणार असल्याने याच वेळेत हवेची चाचणी घेण्यात आली. बिंदू माधव चौकाजवळ खान अब्दुल गफार खान मार्गावर सर्वात कमी प्रक्षण आढळले. सकाळी ८.१३ ते ८. २७ वाजेपर्यंत येथे पीएम २.५ चे प्रमाण ९५ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. माहीम रेती बंदर येथे हे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच १५४ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. शिवाजी पार्क येथील सावरकर स्मारकाजवळ पीएम २.५चे प्रमाण ११६ ते १२५ दरम्यान होते. सेंच्युरी बाजार येथे १०६ ते ११७, जसलोक रुग्णालयाजवळ ११२ ते १२५, मरिन ड्राइव्ह येथे १२३ ते १३७, पालिका मुख्यालयाजवळ ११४ ते १४३ आणि वरळी येथे १०१ ते ११५ इतके पीएम २.५ चे प्रमाण दिसून आले. या सर्व नोंदी सुरक्षित मर्यादा ओलांडत आहेत. यामुळे मुंबईतील हवा मॅरेथॉनपटूंसाठी सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष निघाला आहे.