Nandurbar News | हरणखुरी ठरलंय जिल्ह्यातील पहिले स्थलांतर मुक्त गाव

3 hours ago 2
पुढारी वृत्तसेवा

Published on

19 Jan 2025, 9:45 am

Updated on

19 Jan 2025, 9:45 am

नंदुरबार : Nandurbar News | रोजगाराअभावी मजुरीसाठी शेकडोंच्या संख्येने होणारे स्थलांतर ही नंदुरबार जिल्ह्यातील अनेक वर्षांपासूनची समस्या आहे. स्थलांतर थांबावे यासाठी आजपर्यंत अब्जावधी रुपयांच्या योजना आणि निधी दिला गेला तरीही त्याला पूर्णविराम कधी मिळालेला नाही. तथापि हरणखुरी गाव याला अपवाद ठरु पाहत असून ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील स्थलांतर थांबवण्यात यश लाभल्याचा दावा करण्यात येत आहे. स्थलांतर थांबवण्यात यशस्वी झालेले हरणखुरी हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे.

धडगाव मुख्य शहरापासून २ किमी अंतरावर मोलगी मुख्य रस्त्यालगत हरणखुरी गाव वसलेले आहे. हरणखुरी गावाचे एकूण ३४८.५१ चौ.किमी क्षेत्रफळ गावाला लाभलेले असून गावाला कक्ष नंबर १५ आणि १५ चे ६२.०० हेक्टर क्षेत्र सामुहिक वन हक्क प्राप्त झालेला आहे. गावाला जुने धडगाव, पालखा, कुसुमवेरी, वेरी, सोमणा, भूजगाव, शिवणीपाडा (रोषमाळ बुद्रुक) असे एकूण ७ गावांच्या सीमा लागतात. हरणखुरी गाव पेसा क्षेत्रात समावेश होतो. ग्रामपंचायत भुजगाव अंतर्गत हरणखुरी गाव येते. गावात ९९ टक्के आदिवासी लोकवस्ती आहे. गावात ८३२ इतकी लोकसंख्या असून अल्पभूधारक शेतकरी वास्तव्य करतात. मोसमी शेती आणि पशुपालनासह काही प्रमाणात रब्बी पिके आणि काही भाजीपाला उत्पादन केले जाते.

नंदुरबार जिल्हा सातपुड्याचा पर्वतरांगांमध्ये वसलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नसल्याने येथील आदिवासी बांधव वर्षातील आठ महिने रोजगाराच्या शोधात गुजरात राज्यात स्थलांतर करतात. आजही जिल्ह्यातील हजारो कुटुंब ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात शहरांकडे स्थलांतरित होणारी कुटुंब थेट पाऊस सुरू होण्याच्या अगदी काही दिवस आधी आपल्या घराकडे वळतात. नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतराचा प्रश्न अनेक वर्षापासून आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते जिल्ह्यातील स्थलांतराचा प्रश्न शासन दरबारी सातत्याने मांडत असले तरी कुठेतरी अंमलबजावणीत कमी पडत असल्याचे प्रत्येक वर्षी पाहायला मिळते. मात्र याला अपवाद ठरले आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील हरणखुरी गाव. हरणखुरी गावाला स्थलांतर मुक्त होण्याचा मान मिळाला असून गावातील अकुशल मजुरांना वर्षभर कामे उपलब्ध करून देण्यास ग्रामपंचायत यशस्वी ठरली आहे. या बाबतीत सरपंच अर्जुन पावरा म्हणतात, स्थानिक प्रशासनाचे मार्गदर्शन आणि सहकार्य, रोहयो विभागाचे सहकार्य आणि जनतेचा प्रत्यक्ष सहभाग आणि ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि रोजगार सेवकांच्या मदतीने रोजगार हमी योजनेचा प्रभावीपणे अंमलबजावणी करून गावात सामुहिक कामे आणि वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात आल्या. त्यामुळे मजुरांचे स्थलांतर मुक्त करण्यास यश मिळविले आहे.

रोजगार हमीच्या माध्यमातून पालटले चित्र

कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना कागदपात्रांची पूर्तता पूर्ण करण्यात दमछाक होते. ही गोष्ट नवी नाही हीच बाब लक्षात घेत ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून लाभार्थ्यांना विविध योजनेची माहिती दिली जाते. वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी नियमित सोशल मिडियाचा प्रभावी वापर करत व्हॉट्सअप आणि पाडा विकास समितीच्या बैठक आणि ग्रामसभेच्या माध्यमातून दिली जाते. मागील दोन वर्षापासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सतत रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजुरी मिळवून प्रत्यक्षात कामे सुरु केलेली आहे. रोजगार हमी योजनेसाठी मजुरांना आवश्यक असणारे जॉब कार्ड ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि पंचायत समितीच्या सहकार्याने १०० टक्के तयार करण्यात आलेली आहेत. तर या जॉब कार्डांचे आधार सेडींग करण्यात आले आहे. गावातील सर्व मजुरांचे बँक खाते उघडण्यात आली असून जॉबकार्डशी संलग्न करण्यात आली आहे. कागदपात्रांची पूर्तता करण्यात ग्रामपंचायतकडून विशेष सहकार्य केले जाते. रोहयोच्या कामावर जास्तीत जास्त श्रमिक हजर होतील यासाठी ग्रामपंचायत विविध मार्गाचा अवलंब करते. ग्रामपंचायतीत गावात पाडा विकास कमिटी तयार करण्यात आलेली आहे. या कमिटीच्या माध्यमातून पाड्यामध्ये कामाविषयी निरोप दिला जातो. तसेच आधुनिक सोशल मिडीयाचा वापर करून गावाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला असून या ग्रुपवर कामाविषयी संपूर्ण माहिती दिली जाते. रोहयोच्या कामात पारदर्शकता राहावी यासाठी मस्टररोल प्रत ग्रुपला पाठविली जाते. ज्याच्या मदतीने मस्टररोलमध्ये आलेले श्रमिक कामावर हजर राहतात. काही अडचणी उद्भवल्यास तात्काळ पाठपुरावा करण्याची सोय देखील उपलब्ध कारण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीने केली बहुअंगी अंमलबजावणी

ग्रुप ग्रामपंचायत भुजगाव अंतर्गत हरणखुरी गावात रोजगार हमी योजनेच्या होणाऱ्या कामात प्रशासनाची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली असून जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार, पंचायत समिती धडगाव, वनविभाग धडगाव, तहसिल कार्यालय धडगाव आणि कृषी विभाग धडगाव या विभागाने लक्ष घातले आहे. विविध संस्थांनी देखील गाव विकासात भूमिका निभावणे सुरू ठेवले आहे. हरणखुरी गावात बायफ, सिनी, माविम, आदिवासी जनजागृती, डेव्हलप्मेंट सपोर्ट सेंटर (DSC), विधायक भारती, जनसाहस सारखे विविध विविध सामाजिक संस्था आणि NGO काम करत असून शासनाच्या विवध योजना आणि साधने शेतकरी, महिला बचत गट आणि नागरिकांपर्यंत पोहचविल्या जात आहेत. हरणखुरी गावाला ६२ हेक्टर सामुहिक वनहक्क क्षेत्र (Community forest right) आणि ३७५ हेक्टर महसुली क्षेत्र गावाला लाभलेले आहे. या वनक्षेत्रात रोहयो अंतर्गत पर्यावरण संवर्धन, जलसंवर्धन आणि माती संवर्धनाचे कामे केली जातात. त्यात समतलचर खोदकाम, दगडीबांध, नाला खोलीकरण करणे, बंधारातील गाळ काढणे, वृक्ष लागवड, बांबू लागवड करणे, व्हट खोदकाम आणि जमीन सपाटीकरण आणि मजगीचे कामे करण्यात आली आहेत. त्याच बरोबर कृषी विभागातून फळ झाडांची वाडी लावण्यात आली आहे. रोहयोतून १३ सिंचन विहरी मजूर करून पूर्ण कारण्यात आली आहे. तर रस्ता तयार करण्याच्या कामाला सुरवात केलेली आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजनासारख्या राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेचा देखील हातभार लागला आहे.

शाळा बाह्य मुलांची संख्या झाली शून्य

कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगारच मिळत नसल्याने तालुक्यातून हजारो कुटुंब दरवर्षी महानगरांमध्ये स्थलांतरित होतात. या महानगरांमध्ये गेल्यावर हाताला मिळेल ते काम करून ही कुटुंबं आपला उदरनिर्वाह करतात. सात ते आठ महिने स्थलांतरित झाल्यावर येथील शाळेत जाणाऱ्या मुलांचं ही मोठं शैक्षणिक नुकसान होतं. दिवाळी नंतर कुटुंबासोबत जाणारी चिमुकली मुलं आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडतात. हरणखुरी गाव स्थलांतर मुक्त होताच गावातील शाळा बाह्य मुलांची संख्या शून्य वर आणण्याचे यश ग्रामपंचायतीला मिळाले, असे सरपंच अर्जुन पावरा यांचे म्हणणे आहे. सरपंच अर्जुन पावरा यांच्या नेतृवात उपसरपंच कविता पावरा ग्रा.प. सदस्य कैलास पावरा, ठुमलीबाई रविंद्र पावरा, दिलीप पावरा, मोचडा पावरा, नीता पावरा आणि नीता भिल असे उच्च शिक्षित ग्रामपंचायतीची बॉडी ग्राम रोजगार सेवक सुभाष पावरा, ग्रामसेवक मोहनलाल वळवी आणि गावातील पाडा विकास कमिटी आणि गावातील तरुणांच्या मदतीने अभिनव उपक्रम राबवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article