Published on
:
04 Feb 2025, 3:50 am
Updated on
:
04 Feb 2025, 3:50 am
इगतपुरी/ घोटी : तालुक्यातील ठाकूरवाडी येथील बेपत्ता दोन युवतींचे मृतदेह भाम धरणाच्या आउटलेटजवळ सोमवारी (दि.3) आढळून आले. ३० जानेवारीपासून या दोघी बेपत्ता असल्याची नोंद घोटी पोलिस ठाण्यात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील मनीषा भाऊ पारधी (१९) व सरिता काळू भगत (१८) या दोन युवती 30 जानेवारीपासून बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी दुपारच्या सुमारास या मुलींचे मृतदेह भाम धरणाच्या आउटलेटजवळ गुरुदेव गोरख गिळंदे यांना आढळून आले. त्यांनी याबाबत घोटी पोलिस ठाण्यात महिती कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेणवडचे सरपंच कैलास कडू यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. तसेच पंचनामा करून शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अजय कौटे, हवालदार भानुदास बिन्नर, केशव बस्ते करीत आहेत.
अपहरणानंतर दोघींचे मृतदेह आढळून आल्याने याबाबत तर्कवितर्क लावले जात असून, दोघींनी आत्महत्या केली की, घातपात झाला हे अद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिस तपासानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येऊ शकणार आहे.