Published on
:
03 Dec 2024, 10:12 am
Updated on
:
03 Dec 2024, 10:12 am
इंटरनेटमुळे नोकरी शोधणे पूर्वीसारखे अवघड राहिलेले नाही. अनेक जॉब पोर्टल्स, साईट्सद्वारे तुम्ही नोकरी शोधू शकता. अशाप्रकारे नोकरी शोधताना तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. असा अर्ज करताना अनेकजण चुका करतात. या चुकांमुळे नोकरी मिळण्यात अडचणी येतात.
अनेक जण अर्ज करताना स्वत: विषयीची माहिती तपशिलाने देत नाहीत. म्हणजे आपलं शिक्षण, तसेच या क्षेत्रातील नोकरीचा पूर्वानुभव याबाबत फारच त्रोटक माहिती दिली जाते. तसेच सध्या काम करत असलेल्या आणि पूर्वी काम केलेल्या कंपन्यांमध्ये कोणत्या विषयात स्पेशलायझेशन होते का, यांसारखी माहिती देणे आवश्यक आहे.
इंटरनेटचा विस्तार अवाढव्य असल्यामुळे कंपन्यांकडे दररोज हजारो ऑनलाईन अर्ज येत असतात. येणारा प्रत्येक अर्ज वाचणे आणि त्यातून योग्य उमेदवारांना इंटरव्ह्यूसाठी बोलावणे हे मोठे अवघड काम असते. तुमचा अर्ज अर्धवट असेल तर त्या कंपनीतील एचआर विभागातील संबंधित व्यक्ती अशा अर्जाकडे दुर्लक्ष करतात.
जॉब बोर्डवर तुमचे नाव रजिस्टर केल्यानंतर रिझ्युम अपलोड केला जातो. त्यानंतर त्याला कव्हर लेटर जोडावे. त्यात कंपनीला आवश्यक असणारी सर्व ती माहिती तपशिलाने दिली पाहिजे. अर्ज करणारा उमेदवार हा स्वतःची एखादी माहिती हेतुपूर्वक लपवत आहे, असा समज निर्माण होऊ देऊ नका. अनेक जण ऑनलाईन अर्ज पाठवताना स्वतःचा संपर्क क्रमांक त्यात लिहित नाहीत. ही सर्वात मोठी चूक ठरते. त्यामुळे मोबाईल आणि लॅन्डलाईन असे दोन्ही क्रमांक ठळक अक्षरात अर्जामध्ये नोंदवलेले असले पाहिजेत.
एखाद्या कंपनीने त्यांच्या अर्जाद्वारे उमेदवारांची माहिती मागवली असेल, तर तो अर्ज संपूर्णपणे भरा. त्यातला कोणताही कॉलम मोकळा सोडू नका..
अर्ज करताना सध्या मिळत असलेला पगार व अपेक्षित असलेला पगार याचा स्पष्ट उल्लेख करा. सध्या मिळत असलेला पगार वाढवून लिहू नका. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे, तुम्ही न केलेल्या किंवा तुम्हाला न करता येणाऱ्या गोष्टीचा अर्जात उल्लेख करू नका. स्वतः विषयी खरी माहिती द्या.
काही कंपन्या अर्ज मागवताना 'उमेदवारांनी दूरध्वनी क्रमांकाचा उल्लेख करू नये', 'मेल पुन्हा पुन्हा पाठवू नये' अशा स्पष्ट सूचना देतात. या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
जो सर्वात प्रथम अर्ज करेल, त्यालाच नोकरी मिळेल अशी अट कंपन्यांनी घातलेली नसते. त्यामुळे घाईघाईत अर्ज करू नका. अर्ज करण्यापूर्वी जॉब बोर्ड, रिझ्युम आणि कव्हर लेटरमधील डिटेल्स पुन्हा एकदा तपासा.
अर्जात काही जण स्वतःबद्दल वेगळे मत निर्माण व्हावे म्हणून शैलीदार भाषेचा उपयोग करतात. ज्या कंपनीला नोकरभरती करायची असते, त्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असल्या युक्त्यांकडे लक्ष देत नसतात. ते फक्त उमेदवाराचा सिव्ही बघत असतात. अर्ज केल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर तुम्हाला त्या कंपनीकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही, तर तुम्ही स्वतः त्या कंपनीकडे मेल पाठवून आपल्या अर्जाचे काय झाले, याची चौकशी केली पाहिजे; मात्र असे करताना दिवसात तीन-चार मेल, चार-पाच फोन अशा आततायी पद्धतीने फॉलोअप ठेवू नका