घटनेने थरारला गोदाकाठ आत्महत्येचे कारण अस्पष्ट
परभणी/गंगाखेड(Parbhani):- एकाच कुटुंबातील आई, वडील व मुलगी अशा तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची घटना गुरुवार २८ नोव्हेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने गोदा काठ थरारला असुन आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
रेल्वे रुळावर डोकं ठेवून आत्महत्या केल्याच्या वृत्ताने परिसरात एकच खळबळ
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील ममता कन्या माध्यमीक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नी व मुलीसह गंगाखेड रेल्वे स्टेशनपासून जवळच परभणीकडे जाणाऱ्या लोहमार्गावर गोदावरी नदी पुलाच्या पुढे रेल्वे रुळावर डोकं ठेवून झोपत कोळसा वाहतूक करणाऱ्या माल वाहतूक रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण गोदाकाठ थरारला असुन माल वाहतूक रेल्वेसमोर रेल्वे रुळावर डोकं ठेवून आत्महत्या (suicide)केल्याच्या वृत्ताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रेल्वेसमोर रेल्वे रुळावर डोकं ठेवून आत्महत्या
घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, डिबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक असद शेख, जमादार दिपक व्हावळे, गौस खान पठाण, पोशि. जगन्नाथ शिंदे, परसराम परचेवाड, शेख कलंदर, शिवाजी बोमशेटे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांचे ही मृतदेह शवविच्छेदनासाठी (Autopsy) उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. या घटनेत मृतक झालेल्या शिक्षकाचे नाव मसनाजी सुभाष तुडमे वय ४५ वर्ष त्यांची पत्नी रंजना मसनाजी तुडमे वय ४० वर्ष व मुलगी अंजली मसनाजी तुडमे वय २१ वर्ष सर्व रा. किनी कद्दू ता. अहमदपूर हल्ली मुक्काम बळीराजा कॉलनी गंगाखेड असे आहे.
विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगी या तिघांनी एका विचाराने एकाच रेल्वे रुळावर डोकं ठेवून आजुबाजूला एका ओळीत झोपून आत्महत्या केल्याच्या घटनेने या कुटुंबावर असे कोणते संकट कोसळले होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.