Pathari Assembly Election: चला लोकशाहीतील उत्सवात सहभागी होत मतदान करायला…

2 days ago 1

– पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुक
– परभणीतील बहुचर्चित पाथरी मतदारसंघात उद्या मतदान
– यंत्रणा सज , प्रशासनाकडून तयारी पूर्ण
– मतदान केंद्रावर राहणार प्रशासनाची नजर

परभणी/पाथरी (Pathari Assembly Election) : पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून आज मतदारसंघातील ३ लाख ९३ हजार मतदार १४ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत . पाथरी विधानसभा मतदारसंघात एकूण ४१५ मतदान केंद्र असून २ लाख ३ हजार ४५ पुरुष , १लाख ९० हजार १९७ स्त्री, २ तृतीयपंथी असे ३ लाख ९३हजार २४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत . पाथरी तालुक्यात सर्वाधिक १ लाख १९ हजार १०५ , मानवत तालुक्याती १ लाख १ हजार ४०४ , परभणी ग्रामीण मध्ये ९७ हजार ३८५ तर सोनपेठ तालुक्यात ७५ हजार ३५० मतदार आहेत.

बुधवार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी नियोजित मार्गाने ४१ एसटी बस, ४ मिनी बस , ५६ क्रुझर ,अशा १०१ वाहनातून आवश्यक मतदान यंत्रासह सर्व कर्मचारी मंगळवारी दुपारीच नियुक्त केलेल्या मतदान केंद्राकडे मुक्कामी राहण्यासाठी रवाना झाले होते. मानवत तालुक्यातील शेवडी जहागीर येथील संवेदनशील केंद्र असल्याने प्रशासनाचे या कडे विशेष लक्ष राहणार आहे. पाथरी मतदारसंघातील विधानसभा निवडणूक शांततापूर्वक होण्यासाठी मतदान केंद्रावर किमान एक पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. तर काही ठिकाणी अधिकचा पोलीस बंदोबस्त राहणार आहे त्यासाठी पोलीस प्रशासन स्वतंत्ररित्या विशेष पथकांद्वारे लक्ष ठेवून राहणार आहे. मतदान शांततेत सुरळीत होत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न झाले आहेत .

मतदारांना त्यांचे मतदान केंद्राचे ठिकाण, मतदान केंद्रक्रमांक ,यादीतील क्रमांक समजण्यासाठी बीएलओ मार्फत मतदान चिठ्ठी चे वाटप ही पूर्ण झाले आहे. मतदारांनी या चिठ्ठी सोबत मतदान केंद्रावर जाताना निवडणूक आयोगाने सुचविले एक ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी सकाळी ५.३०वाजता अभिरुप मतदान ( माॅक पोल ) होणार आहे .त्यासाठी प्रत्येक उमेदवारांचे पोलिंग एजंट यांनी मतदान केंद्रावर सकाळी ५.३० पूर्वी उपस्थित रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे .

२०९ मतदान केंद्रावर आतील व बाहेरील भागात वेब कॅमेरे …

पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक विभागाने शहरी भागातील पर्दानशीन केंद्र पाथरी २०, मानवत २०, सोनपेठ १० , परभणी ग्रामीण २८ व ग्रामीण भागात १३६ मतदान केंद्रावर मतदान केंद्रातील आतील भाग व केंद्र बाहेरील भाग असे दोन वेब कास्टिंग कॅमेरे बसविले आहेत . मतदान केंद्रावरील प्रत्येक मतदान केंद्रावर येणार्‍या व्यक्तीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी वेब कॉस्टिंग कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे .यावर प्रशासनाची नजर राहणार आहे.

वेळेवर माहिती देण्यासाठी ४७ झोनल अधिकारी

मतदान केंद्रावरील माहिती वेळेवर व अचूक मिळविण्यासाठी ४७ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे .त्यात पाथरी तालुका १८ मानवत, सोनपेठ प्रत्येकी ९ तर परभणी ग्रामीण ११ झोन चा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक झोनल अधिकारी यांना किमान ५ ते १२ मतदान केंद्राचे झोन मध्ये समावेश असल्याने झोनल अधिकारी निवडणुकीच्या दिवशी प्रत्येक केंद्रावर २ तासाचे आत भेट देणार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी ,आकडेवारी व मतदान केंद्राच्या कामाची माहिती मतदान नियंत्रण कक्षा देण्याच्या सूचना प्रशासनाने दिले आहेत.

बहुतांश केंद्रावर किमान १ महिला अधिकारी

प्रत्येक मतदान केंद्रावर ४ मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महिला मतदारांची ओळख पटविण्यासाठी बहुतांश मतदान केंद्रावर किमान एक महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी हे प्रयत्नशील असून त्यांना मदतीस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड तहसीलदार मानवत , शंकर हांदेश्वार तहसीलदार पाथरी, सुनील कावरखे तहसीलदार सोनपेठ, ईश्वर पवार गटविकास अधिकारी पाथरी, मधुकर कदम गटविकास अधिकारी मानवत, तुकाराम कदम मुख्याधिकारी पाथरी ,श्रीमती कोमल मुख्याधिकारी मानवत ,वसंत हाजन नायब तहसीलदार, जीवन धारासुरकर नायब तहसीलदार, मुकेश राठोड गटशिक्षणाधिकारी , कर्मचारी परिश्रम घेत आहेत .

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article