दिंडोरीच्या केंद्रात वाल्मिक कराड व विष्णु चाटे दोघे दोन दिवस मुक्कामी होते असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. Pudhari
Published on
:
18 Jan 2025, 4:53 am
Updated on
:
18 Jan 2025, 4:53 am
नाशिक : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर प्रकाशझोतात आलेला संशयित वाल्मीक कराड हा दिंडोरी तालुक्यातील श्री स्वामी समर्थ केंद्रात (आश्रम) दोन दिवस थांबल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) तपासात केंद्रातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यास दुजोरा मिळाला आहे. सीआयडी विभागाने केंद्रातील १६ डिसेंबर २०२४ चे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. संशयित कराड या केंद्रात कोणाच्या सांगण्यावरून आला त्याचा शोध तपास यंत्रणा करीत आहे. दरम्यान, तृप्ती देसाई यांनी केलेला आरोप श्री स्वामी समर्थ गुरुपीठाने फेटाळले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरण व आवादा कंपनीकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमधील संशयित वाल्मीक कराड व विष्णू चाटे हे दोघे फरार असताना नाशिकमध्ये मुक्कामी राहिल्याचा दावा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी गुरुवारी (दि. १६) पुणे येथील पत्रकार परिषदेत केला. कराड हा दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्रात मुक्कामी होता. तसेच केंद्रात महिलांचे शोषण होत असल्याच्या तीन महिलांच्या तक्रारी मिळाल्याचाही आरोप देसाई यांनी केला. या आरोपांमुळे केंद्रप्रमुख अण्णासाहेब मोरे यांचा मुलगा चंद्रकांत मोरे यांनी शुक्रवारी (दि.१७) नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत देसाई यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. यासह बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, सीआयडी तपासात कराड हा दिंडोरीतील केंद्रात येऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने महाराष्ट्राबाहेरही मुक्काम केल्याचे सूत्रांनी सांगितले. 'एसआयटी' तपासात आणखी कोणाकोणाचे संबंध उघड होतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
९ डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात संशयित सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे व सुधीर सांगळे या सात जणांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयितांची धरपकड केली असून, २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी कराड विरोधात गुन्हा दाखल असून, तोदेखील पुणे येथे शरण आला. देशमुख यांच्या खुनानंतर कराडही फरार झाल्याचे समोर येत असून, १६ व १७ डिसेंबर रोजी दिंडोरी येथील केंद्रात तो मुक्कामी असल्याचे समोर येत आहे. त्याप्रकरणी सीआयडीने पुरावे संकलित केले असून, त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
गुरुपीठाने केलेला दावा...
'१४ डिसेंबर २०२४ रोजी दत्तजयंती असल्याने केंद्रात दत्तजयंती उत्सव आयोजित केला होता. यात हजारो भाविक सहभागी झाले होते. त्यावेळी आम्ही कोणालाही 'विशेष' वागणूक दिली नाही किंवा मुक्कामाची सोयदेखील केली नाही. २७ डिसेंबर रोजी सीआयडीचे पथक व तपास यंत्रणांनी केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. पथकांनी केंद्रातही पाहणी केली. केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजही सीआयडीला देण्यात आले. त्या फुटेजमध्ये कराड येऊन गेल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी आम्हाला सांगितले. इतर भाविकांप्रमाणेच कराड केंद्रात आल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
नाशिक संदर्भातील प्रश्न अनुत्तरित
देशमुख खुनातील संशयित विष्णू चाटे याने गुन्ह्यात वापरलेला मोबाइल नाशिकला फेकल्याचे सांगितले. मात्र, अद्याप मोबाइल सापडलेला नाही. तसेच संशयित कराड हा नाशिकमध्ये मुक्कामी असल्याचे उघड झाले. मात्र, कराडला या केंद्राबाबत कोणी माहिती दिली व कोणाच्या मध्यस्थीने तेथे गेला होता याचाही तपास सुरू आहे. तसेच या गुन्ह्यातील फरार संशयित कृष्णा आंधळे हा नाशिक रोड परिसरात असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, पोलिसांच्या तपासणीत त्यात तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे मस्साजोग प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे नाशिकमध्ये मिळण्याची शक्यता असली तरी अद्याप ठोस माहिती समोर येत नसल्याचेही चित्र आहे.
अत्याचार, खंडणीच्या गुन्ह्यास उजाळा
नोव्हेंबर २०२३ मध्ये 'तुमचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करू', अशी धमकी देत एका महिलेसह तिच्या मुलाने गुरुपीठाच्या सदस्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे गंगापूर पोलिस ठाण्यात महिलेसह तिच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेकडून जप्त केलेल्या मोबाइल व लॅपटॉपमधील आक्षेपार्ह व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी सुरू असल्याचा दावा नाशिक पोलिसांनी केला होता. मात्र, तो व्हिडिओ खरा आहे की मॉर्फ आहे तसेच व्हिडिओतील व्यक्ती कोण आहेत, याचा तपास अजूनही रखडल्याचे सूत्रांकडून समजते. राजकीय दबावामुळे या गुन्ह्याचा तपास न झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, तृप्ती देसाई यांनी पुणे येथे केलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.