अटलांटिक महासागरात अचानक वादळ आल्याने क्रुझ जहाजातील अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान.Pudhari File Photo
Published on
:
15 Nov 2024, 11:31 pm
Updated on
:
15 Nov 2024, 11:31 pm
न्यूयॉर्क : ‘कधीही न बुडणारे जहाज’ अशी जाहिरात करून जलप्रवासाला निघालेले ‘टायटॅनिक’ जहाज आपल्या पहिल्याच सफरीत अवघ्या चारच दिवसांच्या प्रवासानंतर हिमनगाला धडकून अटलांटिक महासागरात बुडाले होते. शंभर वर्षांपूर्वीच्या या दुर्घटनेच्या कटू आठवणी आजही कायम आहेत. आता याच अटलांटिक महासागरात अचानक वादळ आल्याने भलेमोठे ‘रॉयल कॅरिबियन क्रूझ’ चक्क 45 अंशांनी झुकले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अचानक जहाज पाण्यात झुकल्याने क्रूझ जहाजातील प्रवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागले. या घटनेत क्रुझ जहाजातील अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
क्रूझ हायव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 7 नोव्हेंबर 2024 रोजी रॉयल कॅरेबियनच्या ‘एक्सप्लोरर ऑफ द सीज’ या कू्रझ शीपबाबत घडली. चक्रीवादळाच्या वार्यांमुळे 1 लाख 37 हजार 308 टन वजनाचे हे जहाज एका बाजूला झुकले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत प्रवासी जीव धरून इकडे-तिकडे धावत आहेत. प्रवाशांना सरळ उभे राहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. याशिवाय, जहाजामधील अनेक वस्तू एका बाजूने दुसर्या बाजूला सरकताना दिसत आहेत. क्रू मेंबर्स घाबरलेल्या प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओत जहाजावरील अनेक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज क्रू मेंबर्स जवळपास 5 हजार प्रवाशांना घेऊन प्रवास करत असताना ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, काही प्रवासी आणि क्रू मेंबर्सला किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. या घटनेनंतर क्रू मेंबर्संनी प्रवाशांना पुन्हा एकदा आपल्या खोलीत जाण्यास सांगितले. हा व्हिडीओ 10 नोव्हेंबर 2024 रोजी ‘एक्स’ म्हणजेच जुन्या ट्विटरवर शेअर करण्यात आला. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास 30 दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. या घटनेनंतर प्रवाशांनी सोशल मीडियावर आपला अनुभव शेअर केला. एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘मी देखील याच जहाजात होतो. त्यावेळी डायनिंग रूममधील परिस्थिती भयानक होती. सगळ्या प्लेटस् फुटल्या होत्या आणि जेवण सगळीकडे पसरले होते. लोक आरडाओरडा करीत होते.’