Published on
:
24 Nov 2024, 12:30 am
Updated on
:
24 Nov 2024, 12:30 am
बारामती ः राजेंद्र गलांडे
पक्षफुटीनंतर कुटुंबात एकटे पाडण्याचा प्रयत्न झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीकरांनी सलग आठव्यांदा साथ दिली. विधानसभा निवडणुकीत एक लाखाहून अधिक मताधिक्याने अजित पवार यांनी आपला गड राखला. पुतणे युगेंद्र यांच्यावर त्यांनी मोठी मात केली. ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे यांचा करिष्मा या निवडणुकीत दिसला नाही. लोकसभेवेळेची भावनिक लाट पलटवून टाकत विकासकामांच्या जोरावर अजित पवार यांनी विजय मिळवत बारामतीचा आपणच किंग असल्याचे सिद्ध केले. बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होत होती. लोकसभेवेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर मात केली. खा. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर मात केली होती. त्यात सुळे यांना बारामतीने 48 हजारांचे मताधिक्य दिल्याने अजित पवारांच्या अडचणी वाढल्या होत्या; परंतु लोकसभेच्या पराभवातून लागलीच बाहेर पडत त्यांनी कामाला सुरुवात केली. पक्ष बांधणी नव्याने हातात घेतली. किरण गुजर यांच्यासारख्या ज्येष्ठाच्या नेतृत्वात बूथ कमिट्यांची पुनर्रचना केली. पदाधिकार्यांवरील नाराजी लक्षात घेत त्यांना दूर केले. आवश्यक तेथे फेरबदल केले. त्याचा परिपाक त्यांच्या विजयात झाला.
कुटुंबाची साथ ठरली महत्त्वाची
कुटुंबात मला एकटे पाडले जात असल्याचे अजित पवार म्हणाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई आशाताई, पत्नी खा. सुनेत्रा, भगिनी विजया पाटील, नीता पाटील, डॉ. रजनी इंदुलकर यांच्यासह पुत्र पार्थ व जय खंबीरपणे उभे राहिले. युगेंद्र यांच्या प्रचाराची धुरा शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, शर्मिला पवार व श्रीनिवास पवार यांच्या हाती होती. कुटुंबातून मिळालेली साथ अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. राज्यभर ते सभा घेत असताना कुटुंबीयांनी त्यांची येथील यंत्रणा हाती घेत ती प्रभावी राबवली. प्रचार सांगता सभेत अजित पवार यांच्या आईचे सादर केलेले पत्रही महत्त्वाचे ठरले. बारामतीकर हेच माझे कुटुंब असल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते.
शरद पवार, सुप्रिया सुळेंकडून पुरेसा वेळ नाही
शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली; परंतु या दोन्ही दिग्गज नेत्यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेला प्रचारासाठी वेळ दिला गेला नाही. सांगता सभेतही शरद पवार यांच्याकडून क्लिअर मेसेज मतदारांना दिला नाही. प्रचार काळात त्यांनी अजित पवार यांच्या कामाविषयी तक्रार नाही; परंतु नव्या पिढीला संधी दिली पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्यातून जायचा तो संदेश गेला. मतदान करून या दोन्ही मातब्बर नेत्यांनी बारामती सोडली. त्याचाही मतदानादिवशी विपरीत परिणाम झाला. लोकसभेवेळी भावनिकतेचा मुद्दा बारामतीत प्रभावी ठरला होता. या निवडणुकीत तो बाजूला फेकला गेला. अजित पवार यांच्या विकासाच्या मुद्द्याला मतदारांनी भरभरून साथ दिली.
लोकसभेला ‘ताई’... विधानसभेला ‘दादा’
लोकसभेला ‘ताई’ व विधानसभेला ‘दादा’ असे समीकरण बारामतीकरांनी पक्के केले होते. लोकसभा प्रचारावेळी बारामतीकर उघडपणे ते बोलून दाखवत होते. त्यांनी ते प्रत्यक्षात खरे करून दाखवले. याच विधानाची अजित पवार रोज आठवण करून देत होते. लोकसभेला सुळे यांना भरभरून मते देणार्या बारामतीकरांनी विकासकामांच्या झपाट्यामुळे अजित पवार यांनाही मतदान करताना कोणतीही कसूर ठेवली नाही.