सिंधुदुर्गनगरी : पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री नितेश राणे. सोबत आ. दीपक केसरकर.pudhari photo
Published on
:
04 Feb 2025, 1:00 am
Updated on
:
04 Feb 2025, 1:00 am
कुडाळ : पुढील आर्थिक वर्षात डिसेंबर महिन्यापर्यंत वार्षिक विकास आराखड्यातील सर्व निधी खर्च होईल, असे नियोजन करण्यात येणार असून उरलेल्या तीन महिन्यांत अधिकचा निधी शासनाकडे मागितला जाईल, असा निर्धार पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी जिल्हा नियोजन समिती सभा संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत, जनतेच्या विकासासाठी जे काही करायला हवं ते आम्ही करणार, अधिकार्यांचा कामातील चालढकलपणा खपवून घेणार नाही, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा नियोजन बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. आ. दीपक केसरकर उपस्थित होते. राणे म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक पैशावर आपल्या जनतेचा अधिकार आहे. आपण जिल्ह्याचा प्रारूप आराखडा 400 कोटींवर गेला असं म्हणतो. यातील अधिकाधिक निधी आणून तो खर्च कसा होईल त्यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत.यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली जाईल. जिल्ह्यात किती निधी आला,कसा खर्च झाला, याची माहिती घेतली जाईल.आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे राहणीमान उंचावले पाहिजे, त्यासाठी जिल्हा नियोजनमधून आलेला निधी खर्ची व्हायलाच पाहिजे.दरवर्षी आर्थिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात निधी खर्च करणे याला अधिकार्यांचे कामं म्हणता येणार नाही असेही पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
अधिकार्यांच्या बिनधास्त सुट्ट्या चालणार नाहीत
यापुढे अधिकार्यांची बेशिस्तपणा,अवाच्या सव्वा खर्च, बिनधास्तपणे सुट्या घेणं हे चालू देणार नाही.जिल्ह्माचं भविष्य घडविण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत.ज्या अधिकार्यांना शाबासकी मिळवायची असेल त्यांनी आपली जबाबदारी पुर्ण करावी.आपल्या अधिकारातील निर्णय वेळेत आणि पारदर्शकपणे घ्यावेत.नियोजन समितीच्या बैठकीत आमदार निरंजन डावखरे यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. शिक्षण विभागात पैशाची डिमांड करणार्या अधिकार्यांवर निश्चितच कारवाई होणार आहे.आम्ही सुक्या धमक्या देत नाही.जिल्हापरिषद मध्ये सुरू असलेला कारभार योग्य नाही,अशा अधिकार्यांवर यापुढे माझा बारीक लक्ष राहणार आहे असा इशाराही पालकमंत्री राणे यांनी दिला.
काही जणांच्या हाताला लकवा मारला आहे
आमच्या जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, क्रीडा आदी सर्व विभागाकडे बारकाईने लक्ष दिले जाईल, निधीसाठी सुक्ष्म नियोजन केले जाईल.आजची नियोजन बैठक केवळ ट्रेलर होता. आजच्या बैठकीनंतर प्रशासकिय वर्गात जो काही मेसेज जायला हवा तो मेसेज गेला असेल.चांगली कामं होण्यासाठी काही कटु निर्णय घ्यावे लागतील.राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार सिंधुदुर्ग जिल्हा बॅकेत आले होते, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की, कुणाच्या तरी हाताला लकवा मारला आहे, म्हणून तसाच लकवा मुख्यालयातील लोकांच्या हाताला मारला आहे की काय? हे पहावं लागणार आहे.
चालू आर्थिक वर्षात आपल्या जिल्ह्यात 250 कोटीपैकी 104 कोटी रुपये खर्च झालेत. मार्च अखेरपर्यंत सर्व निधी खर्च केला जाईल. त्यासाठीचे नियोजन केले जाईल.आज या बैठकित जे निर्णय घेतले ते पुर्ण करुन घेण्याची माझी जबाबदारी आहे. आम्ही सर्व जण आपले सेवक आहोत.जनतेच्या विकासासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही स्वतः पुढाकार घेऊन करणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
सोशल मिडियावर टाईमपास करणार्या अधिकार्यांवर कारवाई
अधिकारी वर्गाने जिल्हा नियोजनच्या बैठकीत शिस्तीचे पालन केले पाहिजे. आम्ही जर एवढा वेळ जिल्ह्याच्या विकासासाठी देत असू आणि अधिकारी वर्ग सोशल मीडियावर टाईमपास करत असतील तर त्या अधिकार्यांना सोशल मीडियावर टाईमपास करण्यासाठी पाठवून देण्याची व्यवस्था केली जाईल असे एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री राणे यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचा कारभार सुधारण्यासाठी काही लोकांच्या बदल्या कराव्या लागतील. काही कटू निर्णय घ्यावे लागतील. काहींना आर्थिक शिस्त लावावी लागेल, हे सर्व बदल येणार्या कालावधीत प्रकर्षाने दिसून येतील.जिल्ह्यातील डीएड बेरोजगारांच्या प्रश्नाबाबत शासन स्तरावर मंत्री म्हणून मी स्वतः पाठपुरावा करत आहे.
बांगलादेशी प्रकरणात पोलिसांना घरी पाठवणार
कणकवली येथील बांगलादेशी महिला प्रकरणी ज्या पोलिसांनी चुकीचं काम केलं आहे, त्या पोलिसांना आम्ही घरी पाठवणार हे निश्चित आहे. महामार्ग चौपदरीकरणवर रमलर स्ट्रीप टाकण्याबाबत सूचना संबंधित यंत्रतेला दिल्या जातील असे मंत्री राणे यांनी सांगितले.
हत्तीं प्रश्नाबाबत अनंत अंबानींशी चर्चा
जिल्ह्यातील हत्तींच्या प्रश्नाबाबत अनंत अंबांनी यांच्याशी माझी चर्चा झाली असून त्यांनी जामनगर मध्ये वर्ल्ड तारा प्रकल्प राबविला आहे. बारामती मध्ये तीन बिबट्यांचा असाच एक जटिल प्रश्न होता, तो त्यांनी अजित पवार यांच्याशी संपर्क करून त्या बिबट्यांना त्या ठिकाणाहून हलवले. मी सुद्धा आनंद अंबानी यांना येथील वन्य प्राण्यांच्या उपद्रवाबाबत विनंती केली आहे. या ठिकाणी प्राणी संग्रहालय उभारण्याबाबतही माझा विचार आहे, त्यांची टीम लवकरच सिंधुदुर्गात आली की, हत्ती असो किंवा बिबटे त्यांना या ठिकाणाहून हलविण्याबाबत कार्यवाही केली जाईल. वनमंत्री गणेश नाईक यांच्या सोबतही या प्रश्नी चर्चा झाली असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.