Published on
:
18 Jan 2025, 5:17 am
Updated on
:
18 Jan 2025, 5:17 am
अमरावती : leopard killed in Amravati | अमरावती- नागपूर महामार्गावर रहाटगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत शुक्रवारी (दि.17) पुन्हा एक बिबट्या ठार झाला. वाहनाच्या धडकेत बिबट्याचा हा महिनाभरातील चौथा मृत्यू आहे. त्यामुळे पर्यावरण प्रेमीनी चिंता व्यक्त केली आहे.
बिबट्या ठार झाल्याची माहिती मिळताच वनविभागाचं पथक अमरावती- नागपूर महामार्गावर पोहोचलं. मृत बिबट्याला वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात नेण्यात आले. याच परिसरात वनविभागाचे अधिकारी आणि वन्यजीव समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले.
अमरावती शहरालगत असणाऱ्या चिरोडीच्या जंगलात 7 डिसेंबर रोजी सकाळी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाला होता. या घटनेच्या लगेच दुसऱ्या दिवशी याच भागात आणखी एक बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला होता. सलग दोन दिवस दोन बिबट्या एकाच मार्गावर ठार झाल्यामुळं खळबळ उडाली होती. यानंतर 20 डिसेंबरला अमरावती-नागपूर एक्सप्रेस हायवेवर वडाळी ते महादेव खोरी दरम्यान गुणवंत बाबा मंदिराजवळ दोन वर्षे वयाचा बिबट्या वाहनाच्या धडकेत ठार झाल्याचे समोर आले होते. महिनाभरात अमरावती शहरालगत चार बिबट्या ठार झाल्याने वन्यप्राणीप्रेमींमधून चिंता व्यक्त होत आहे. मागील काही वर्षांपासून अमरावती शहर परिसरात बिबट्यांचा वावर वाढला. बिबट्यांच्या सुरक्षेबाबत वनविभागाकडून योग्य नियोजन व्हावे, अशी मागणी पर्यावरण व वन्यजीव प्रेमींकडून होत आहे.
या परिसरात बिबट्यांचा वावर
शहराच्या जवळ राहटगाव ,अर्जुन नगर , विभागीय आयुक्त कार्यालय परिसर या भागात अनेकदा बिबट्याचा वावर दिसून आला आहे. या भागात बिबट्या आहेत, असं या परिसरातील नागरिक सांगतात. दोन्ही बाजूने जंगल आहे. यासह संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे.
बिबट्या मादीच्या मृतदेहाची प्राथमिक तपासणी
शुक्रवारी अपघातात मृत झालेल्या बिबट्याला वडाळी परिक्षेत्रा अंतर्गत वन्यप्राणी प्रथोमपचार केंद्र येथे आणण्यात आले. सहाय्यक वनसंरक्षक (कॅम्प व वन्यजीव) अमरावती यांचे उपस्थितीत तसेच मानद वन्यजीव रक्षक जयंत वडतकर यांचे उपस्थितीत पशुधन विकास अधिकारी (प्रयोग शाळा) डॉ. अतुल खेरडे, पशुधन विकास अधिकारी (शल्य विकात्सालय) डॉ. नितीन पाटणे यांनी बिबट्या मादी मृतदेहाची प्राथमिक तपासणी केली. त्यानंतर श्वविच्छेदन केले.