Published on
:
01 Feb 2025, 1:31 am
Updated on
:
01 Feb 2025, 1:31 am
सांगली : अमली पदार्थप्रकरणी कोणतीही हयगय करू नये, अमली पदार्थांची तस्करी करणार्यांवर कठोर कारवाई करावी, नुसत्या प्रबोधनाने अमली पदार्थ तस्करीचा विषय संपणार नाही, असे सांगून कठोर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. तसेच प्रबोधन व जनजागृती करणार्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. पोलिस विभागाशी संपर्क साधून आपली याबाबतची संकल्पना स्पष्ट करावी. त्याचा सर्व खर्च जिल्हा नियोजन समिती किंवा सीएसआरमधून उचलला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेतली, या बैठकीत ते बोलत होते. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा, मिरजचे उपअधीक्षक प्रणील गिल्डा, सांगलीच्या उपअधीक्षक विमला एम., इस्लामपूरचे मंगेश चव्हाण, जतचे सचिन साळुंखे, तासगावचे सचिन थोरबोले, एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, अमली पदार्थ दुष्परिणामाबाबत प्रबोधन व जनजागृती करणार्या संस्थांनी पुढाकार घ्यावा. पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधावा. त्याचा खर्च स्वतः करणार आहे. नशाखोरी मुळापासून उखडून टाकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी योगदान देऊ, त्यात समाजाची साथ गरजेची आहे. माहिती देणार्यांना बक्षीस दिलेच आहे, पण आता समाजसुधारणेत पुढाकार घेणार्यांसाठी आम्ही पुढाकार घेत आहोत. पोलिसांसाठी कल्याण निधी, पोलिसांसाठी अद्ययावत संसाधने, पोलिसांना माहिती मिळण्याची व्यवस्था, खबर्यांना आर्थिक मदत देण्याची तरतूद केली जाईल. चांगले वागणार्यांना वेळीच शाबासकी देऊ. पण, चुकीचे वागणार्यांना शासन दिले पाहिजे.
या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती घेतली. कामगिरीचा आढावा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी सादर केला. विटा येथील 30 कोटीच्या अमली पदार्थप्रकरणी पोलिस दलाच्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करून पालकमंत्री पाटील यांनी अभिनंदन केले. या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार, अंमलदारांचे प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन कौतुक केले.