Published on
:
25 Nov 2024, 12:11 am
Updated on
:
25 Nov 2024, 12:11 am
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नाईक कुटुंबात पडलेली फूट, पक्षातील बंड थोपविण्यात भाजपाला आलेले यश, मतदारसंघातील सर्व विरोधी गटांची एकजूट, त्यातच शासनाच्या लाडकी बहीण, शेतीसाठी वीजबिल माफी अशा योजनांचा फटका शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीला बसला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा अन् त्यांनी दिलेला, कायद्याच्या चौकटीत बसवून शिराळ्याची नागपंचमी सुरू करण्याचा शब्द ‘गेमचेंजर’ ठरला.
शिराळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळल्याचे शनिवारच्या निवडणूक निकालाने स्पष्ट झाले. भाजपा-महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना 22 हजार 689 इतके मताधिक्य मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. मतदानाची आकडेवारी पाहता, सत्यजित देशमुख यांची ताकत वाढल्याचे दिसत आहे.
सत्यजित देशमुख यांच्या विजयासाठी भाजपाचे नेते सम्राट महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन सर्व ताकत सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी उभी केली. यामुळे वाळवा तालुक्यातील 48 गावांत देशमुख यांना मोठे मताधिक्य मिळाले. या सर्व 48 गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आपली सर्व शक्ती पणाला लावली होती. मानसिंगराव नाईक यांच्या विजयासाठी गावोगावी सभा, बैठका घेतल्या. पण जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांनी साथ दिली नाही. याउलट सम्राट महाडिक यांनी या सर्व गावांमध्ये मोठी ताकद लावत देशमुख यांना मताधिक्य मिळवून दिले.
विधानसभा निवडणुकीत सम्राट महाडिक स्वतः शिराळा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यांनी अर्जही दाखल केला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना ‘योग्य संधी देऊ’ असे सांगत अर्ज मागे घेऊन सत्यजित देशमुख यांना साथ देण्याची विनंती केली. त्यांचा शब्द मानून सम्राट महाडिक यांनी सत्यजित देशमुख यांच्या पाठीशी सर्व ताकत उभी केली. राहुल महाडिक, आमदार सदाभाऊ खोत, सी. बी. पाटील, प्रताप पाटील, सुखदेव पाटील, केदार नलवडे, जगदीश कदम, के. डी. पाटील, अनिता धस, अॅड. भगतसिंग नाईक, रणजित नाईक, पृथ्वीसिंग नाईक, हणमंतराव पाटील यांची मोठी ताकद सत्यजित देशमुख यांना मिळाली.
दुसरीकडे मतदारसंघात केलेल्या दोन हजार कोटींच्या विकासकामांच्या जोरावर मानसिंगराव नाईक पुन्हा एकदा मैदानात उतरले होते. मतदारसंघातील कामे, वाकुर्डे योजना, सर्वांगीण विकास आदी मुद्दे घेऊन ते लोकांपर्यंत गेले. मी केलेली विकासकामे पाहा, विकास दिसत असेल तरच मला मत द्या, असे जाहीर आवाहन मानसिंगराव नाईक प्रचारात करत होते. मात्र कोट्यवधीची कामे पूर्ण करूनही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
शिराळा विधानसभा मतदारसंघात असलेल्या वाळवा तालुक्यातील 48 गावांमध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचीही मोठी ताकद आहे. शिवाजीराव नाईक, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक दोघेही मानसिंगराव नाईक यांच्या बरोबरीने प्रचारात सक्रिय होते. मात्र ते मानसिंगराव नाईक यांना मताधिक्य देऊ शकले नाहीत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बलाढ्य मानल्या जात असलेल्या आमदार मानसिंगराव नाईक गटाला खिंडार पडले. नाईक यांचे चुलतबंधू अॅड. भगतसिंग नाईक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भगतसिंग नाईक यांचे वडील व फत्तेसिंगराव नाईक यांचे बंधू वसंतराव नाईक दोनवेळा आमदार होते. अॅड. भगतसिंग नाईक राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष, तर माजी सभापती होते.
शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. यांचा गट शिवसेनेत गेल्याचा मानसिंगराव नाईक यांना फटका बसला, तर सत्यजित देशमुख यांची ताकत वाढली. माजी नगरसेवक विश्वप्रतापसिंग नाईक, युवा नेते पृथ्वीसिंग नाईक यांच्यासह संपूर्ण गट सत्यजित देशमुख यांच्या प्रचारात सक्रिय झाला. याचदरम्यान भाजपाचे सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक आणि सदाभाऊ खोत यांचे मनोमीलन झाले. सदाभाऊ खोत आमदार झाल्याने भाजपाची ताकत मतदारसंघात वाढली.
तसेच केंद्रात व राज्यात भाजप सत्तेत असल्याने मतदारसंघाच्या विकासासाठी निधी आणण्याचा सपाटा सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक यांनी लावला. त्यांनी मतदारसंघातील गावा-गावात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीत याचा फायदा सत्यजित देशमुख यांना झाला. माजी मंत्री शिवाजीराव देशमुख यांना मानणारा मोठा गट मतदारसंघात आहे. वडिलांच्या इच्छेखातर आपण कोणतेही पद नसताना गेली 35 ते 37 वर्षे राजकारण-समाजकारणात कार्यरत असल्याचे सत्यजित देशमुख सातत्याने प्रचारादरम्यान लोकांसमोर मांडत आले. त्याचीही सहानुभूती सत्यजित देशमुख यांना मिळाली.
नागपूजेस कायद्याच्या चौकटीत परवानगीचे आश्वासन
सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शिराळ्यात सभा झाली. यावेळी बोलताना शहा यांनी शिराळकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नागपंचमीच्या विषयाला हात घातला. नागपंचमीवरील न्यायालयीन निर्बंधांचे खापर तत्कालीन सत्ताधार्यांवर फोडत शिराळ्याच्या नागपंचमीस गतवैभव प्राप्त करून देण्याची ग्वाही दिली. गेल्या वीस-बावीस वर्षांपासून पारंपरिक जिवंत नागपूजेस परवानगीसाठी संघर्ष करीत असलेल्या शिराळकरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत भाजपाला कौल दिल्याचे दिसते.