मराठीसह हिंदी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रतिष्ठित ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
अशोक सराफांना पद्मश्री पुरस्कार
देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्म पुरस्कार हे पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. सिनेसृष्टीतील अतिशय महत्त्वाच्या योगदानासाठी अभिनेते अशोक सराफ यांनादेखील पद्मश्री जाहीर झाला आहे. नक्कीच ही गौरवाची बाब आहे.
गेल्या वर्षीच अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही सम्मानित करण्यात आलं होतं. तर या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना मानाचा पद्मश्री पुरस्कारही जाहीर करण्यात आला आहे. याबद्दल त्यांना सर्वांनीच शुभेच्छा दिल्या आहेत.
निवोदिता सराफ यांनी व्यक्त केला आनंद
दरम्यान अशोक सराफ यांना मिळालेल्या या मोठ्या सन्मानाबद्दल त्यांची पत्नी निवोदिता सराफ यांच्याशी TV9 ने संवाद साधला असता निवोदिता यांनी याबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. निवोदिता सराफ यांनी पती अशोक सराफ यांना मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराबदद्ल आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे.
निवोदिता म्हणाल्या “खूप आनंद झाला मला,खूप समाधान वाटत आहे. मुख्य म्हणजे हा पुरस्कार अतिशय लायक माणसापर्यंत पोहोचला याचं फार समाधान आहे. पण सोबतच निवोदिता यांनी एक खंतही व्यक्त केली आहे.
निवोदिता सराफ यांनी खंत व्यक्त केली
निवोदिता सराफ यांनी एक खंत व्यक्त केली आहे. ” पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे पण खर तरं हा पुरस्कार खूप आधीच मिळायला हवा होता. पण ठिके आता तो पुरस्कार मिळाला याबद्दल नक्कीच आनंद आहे” अशा प्रकारे अशोक सराफ यांना हा पुरस्कार मिळायला उशीर झाल्याचं म्हणत निवोदिता यांनी खंत व्यक्त केली आहे.
तसेच पुढे निवोदिता यांनी म्हटलं “मी त्यांची एक जबरदस्त फॅन आहे एक अभिनेता म्हणून ते फारच उच्च आहेत आणि तितकेच ते माणूस म्हणूनही ग्रेट आहेत… त्यांना कायम फक्त अभिनयच महत्त्वाचा होता आणि आहे. त्यांनी पैसे किती मिळतील किंवा काय याचा कधीच फार विचार केला नाही. हा पुरस्कार मिळाला यात त्यांच्या आई वडिलांचेही खूप मोठा योगदान आहे. आणि मी त्यांची जबरदस्त फॅन तर आहेच, ..” अस म्हणत निवोदिता यांनी पत्नी म्हणून अशोक सराफ यांचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.
मराठी अन् हिंदी चित्रपटात आपली वेगळी ओळख निर्माण केली
अशोक सराफ यांचा जन्म 1947 साली मुंबईतच झाला. 1969 पासून ते सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. ‘जानकी’ या सिनेमातून त्यांनी अभिनयात पदार्पण केलं. 300 पेक्षाही जास्त सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसेच हिंदीमध्येही त्यांनी आपली अशी वेगळी छाप सोडली आहे.