आ. किरण सामंत file photo
Published on
:
04 Feb 2025, 12:55 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:55 am
रत्नागिरी : सह्याद्रीच्या पट्ट्यात धो-धो पाऊस पडूनही, या भागातील गावांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. साखरपा, लांजा राजापूरच्या सह्याद्रीच्या पट्ट्यामधील पाणी टंचाईचे प्रश्न सोडवण्यासाठी लघुपाटबंधारेच्या माध्यमातून नूतन आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी नवे प्रकल्प हाती घेतले आहेत. गेली अनेक वर्ष रखडलेल्या पालू लघु पाटबंधारे प्रकल्प योजनेचा शुभारंभ करुन ग्रामस्थांना विश्वास दिला आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातील अनेक गावकर्यांच्या आशा भैया सामंत यांच्यावर स्थिरावल्या आहेत.
सह्याद्रीच्या पट्ट्यात सर्वाधिक पावसाची नोंद दरवर्षी होत असते, परंतु पाऊस झाला की या पट्ट्यातील गावांमधील विहिरीमध्ये खडखडाट होतो. नोव्हेंबरपासूनच ग्रामस्थ पाण्यासाठी धावाधाव सुरु करतात. जिल्ह्यात टँकरची पहिली मागणीही लांजा तालुक्यातील चिंचवटी व अन्य गावांमधून होत असते.
डोंगराळ भाग असूनही या ठिकाणी शेती व पशुधन मोठ्याप्रमाणात असून दुग्ध उत्पादन मोठे होते. त्यामुळे पावसाळ्यानंतर ग्रामस्थांना पशुधनाच्या पाण्यासाठीही धावपळ करावी लागते. येथील शेतीही पावसावरच अवलंबून राहिलेली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यातील अनेक गावांमधून लघुपाटबंधारे प्रकल्पांची मागणी वारंवार ग्रामस्थांमधून केली जात होती.
लांजा तालुक्याच्या पूर्वपट्ट्यातील पालू, चिंचरटी, धावडेवाडी, उंबरवणे, गोवीळ गावातील ग्रामस्थांची अनेक वर्ष लघु पाटबंधारे प्रकल्पाची मागणी होती. पालू येथे हा प्रकल्प व्हावा म्हणून काही वर्षापूर्वी सर्व्हेक्षणही झाले होते. परंतु हा प्रकल्प मार्गी लागला नव्हता. नुतन आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्याकडे ग्रामस्थांनी पालू लघू पाटबंधारे योजनेबद्दल साकडे घातले होते. आ. सामंत यांनी यात विशेष लक्ष घालत या प्रकल्पाला मंजुरी घेतली.
पालू लघू पाटबंधारे योजनेमुळे जवळपास 147 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, 2,244.15 स.घ.मी. पाणी साठा होणार आहे. या योजनेसाठी जवळपास 55 कोटी 47 लाखाचा निधीही मंजूर झाला असून नुकताच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवातही झाली आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चार वर्षाचा कालावधी ठेकेदाराला दिलेला आहे.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर भैया सामंत यांनी विकासकामांना हात घातला असून, जनतेच्या पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.