Published on
:
04 Feb 2025, 12:50 am
Updated on
:
04 Feb 2025, 12:50 am
रत्नागिरी : पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे पुस्तकातील वह्यांची पाने गायब होणार आहेत. त्यामुळे दप्तराचे ओझे पुन्हा वाढणार असल्याने विद्यार्थ्यांचे कंबरडेही वाकणार आहे.
पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने वर्षभरातच मागे घेतला आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते आठवी या वर्गासाठी पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुढील शैक्षणिक वर्षापासून तो निर्णय मागे घेण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना वह्यांच्या पानांशिवाय पुस्तके मिळणार आहेत. दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना राज्य सरकारने पुस्तकांना वह्याची पाने लावण्याचा निर्णय घेतला होता. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा आणि पुस्तकातच महत्त्वाच्या नोंदी लिहिण्याचा उद्देश ठेवून हा निर्णय घेतला होता. मात्र, वर्षभरातच हा निर्णय मागे घेतल्याने आता पुन्हा दप्तराचे ओझे वाढणार आहे.
या योजनेमुळे सरकारवर आर्थिक ताण वाढल्याचे लक्षात आले आहे. इयत्ता आठवीपर्यंतच्या सर्व पुस्तकांमध्ये कोरी पाने जोडण्यात येत होती. गेल्या दोन वर्षापासून ही पुस्तके वितरित करण्यात येत आहेत. प्रत्येक वर्षी लाखो पुस्तकांची छपाई करण्यात येते. त्यामुळे सरकारला त्यांचा अतिरिक्त खर्चाचा ताणपण करावा लागतो.
एक राज्य-एक गणवेश योजनाही गुंडाळली
शासनाने दोन वर्षांपूर्वी एक राज्य-एक गणवेश योजना जाहीर केली होती. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार होता. मात्र ही योजना बदलण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या संदर्भात आदेश काढण्यात आला होता. मोफत गणवेश अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समिती करणार आहे. शासनाने निश्चित केलेली रक्कम समितीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
पानांचा उपयोग न केल्याने योजना बंद
दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी पाठ्यपुस्तकांत वह्यांची पाने दिली होती; परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्याही घेऊन ये असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकांमधील कोर्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरिता वापर होत नसल्याचे आढळून आल्याने ही योजना बंद केली आहे.