आभाळमाया – ‘हबल’ची बारीक नजर!

3 hours ago 2

>> वैश्विक,  [email protected]

गेली 34 वर्षे आणि सहा महिन्यांहून अधिक काळ अव्याहतपणे अवकाशाचा ‘वेध’ घेऊन त्याची भरपूर माहिती आपल्यापर्यंत म्हणजे पृथ्वीवर पाठवणाऱ्या ‘हबल स्पेस टेलिस्कोप’ला मानले पाहिजे. सुमारे अडीच मीटर (14 फूट) लांबीचा आरसा असलेल्या या दुर्बिणीने 24 एप्रिल 1990 या दिवशी पृथ्वीचा निरोप घेतला. 25 एप्रिलला पृथ्वीच्या जवळच्या (लो-अर्थ) कक्षेत आपले बस्तान यशस्वीतेने बसवले ते आजतागायत! 20 मे 1990 पासून ‘हबल’च्या अवकाश निरीक्षणाला झालेली सुरुवात माणसाचे ‘डोळे उघडणारी’ ठरली. दूरस्थ अवकाशातील कित्येक ‘वस्तूं’चे लाखो फोटो ‘हबल’ने पृथ्वीकडे पाठवले आणि आपले विश्व आपल्यासमोर उत्तरोत्तर उलगडत गेले.

आमची ‘खगोल मंडळ’ संस्था आम्ही 1985 मध्ये स्थापन करून छोटय़ा दुर्बिणीमधून अवकाशाचा वेध घ्यायला शिकत असतानाच ‘हबल’च्या प्रक्षेपणाने सर्वच सभासदांना आनंद झाला होता. आमच्या ‘खगोल वार्ता’मधून आम्ही तो साजराही केला. त्यालाही आता लवकरच 40 वर्षं होतील. तेव्हापासून अवकाश दुर्बिणींचा जो सिलसिला सुरू झाला त्यात ‘चंद्रा’ ही हिंदुस्थानी खगोलशास्त्रज्ञ, नोबेल विजेते चंद्रशेखर सुब्रमण्यम् यांच्या नावे अवकाशात गेलेली ‘एक्स-रे दुर्बिण’ वेधशाळा किंवा तीनच वर्षांपूर्वी 25 डिसेंबर 2021 रोजी उड्डाण केलेली ‘जेम्स वेब’ अवकाश दुर्बिण अशा अनेक दुर्बिणींच्या ‘डोळय़ां’नी आपण अवकाश जवळून न्याहाळू लागलो. यापुढचा टप्पा म्हणजे 2027 मध्ये अवकाशात जाणारी ‘नॅन्सी ग्रेस रोमन टेलिस्कोप.’ नॅन्सी ग्रेस या महिला संशोधिकेलाच ‘मदर ऑफ हबल’ किंवा ‘हबलची आई’ असे विश्लेषण लाभले आहे.

या लेखात ‘हबल’चे एवढे कौतुक करण्याचे कारण म्हणजे ‘हबल’ने ‘इपॅरस’ या अतिदूरच्या ताऱ्याचा फोटो पृथ्वीकडे पाठवलाय. आपल्यापासून 9 अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या निळय़ा रंगाच्या आतापर्यंत फोटो काढलेल्या ‘इपॅरस’ नावाच्या ताऱ्याचा हा पहिलावहिला फोटो आहे. त्याचा शोध ‘हबल’नेच 2013 मध्ये लावला होता.

विश्वाचा जन्म 13.7 अब्ज वर्षांपूर्वी झाला असे आधुनिक खगोलविज्ञान ‘बिग बँग’ सिद्धांतानुसार मानते. हे आपले एकूण विश्वापैकी फक्त 4 टक्के असलेला निरीक्षण करता येण्यासारखा (ऑब्जर्व्हेशन) ‘विश्वांश’सुद्धा एवढा व्यापक आहे की, त्याचा वेध घेणे खरोखरच कठीण काम; परंतु ‘हबल’ या सातफूट व्यासाचा आरसा असलेल्या परावर्ती दुर्बिणीने आजवर ज्या उत्साही करामती केल्या आहेत त्यापैकी ताजी (लेटेस्ट) करामत म्हणजे ‘इपॅरस’ ताऱ्याचा फोटो! आता, एवढय़ा दूरस्थ ताऱ्याचा फोटो घेतला कसा? मुळात तो हबलला ‘दिसला’ कसा? याचे उत्तर आहे, ‘ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग’ किंवा ‘गुरुत्वीय भिंग’ या संकल्पनेत.

तर ‘इपॅरस’ ताऱ्याविषयी.. त्याचे विज्ञानिक नाव मॅक्सजे1149 लेन्स स्टार-1. त्यापेक्षा इपॅरस हे लक्षात ठेवायला सोप्पं नाही का? ‘हबल’च्या तीक्ष्ण नजरेला दिसलेला हा सातवा अतिदूरस्थ तारा आहे. त्याचा जन्म विश्वनिर्मिर्तीनंतर लगेच म्हणजे साधरण 9 अब्ज वर्षांपूर्वी झाला आणि बिग बँगनंतर साडेचार अब्ज वर्षांपासून त्याचा प्रकाश सर्वदूर पसरतोय.

सिंह राशीत असलेल्या या ताऱ्याचा ठावठिकाणा लागला तो एसवन रेपन्सडेल नावाचा सुपरनोव्हा (अतिनवतारा) अभ्यासताना. अमेरिकेतील मिनिसोटा विश्वपीठातील केली नावाच्या अभ्यासकाला या ताऱ्याचा ‘पत्ता’ गवसला. या संशोधनामुळे विश्वनिर्मितीनंतर लगेच जन्माला आलेले आणि विविध दीर्घिकांच्या मागे (बॅकग्राऊंडला) असलेले तारे शोधण्याला अधिक गती लाभली आहे. आता यातला एक शब्द आहे ‘लेन्स्ड स्टार’ हे काय प्रकरण आहे?

यासाठी साध्या शब्दांत ‘ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग’ची संकल्पना जाणून घेऊया. आमच्या खगोल मंडळातील अर्चना यांनी याच विषयावर डॉक्टरेट मिळवली आहे. ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंगद्वारा दूरस्थ ताऱ्यांचा शोध लागतो तो, निरीक्षक आणि त्या ताऱ्याच्या मधे आलेल्या एखाद्या प्रचंड वस्तुमानाच्या गोष्टीमुळे. या वस्तूच्या गुरुत्वाकर्षणाने त्यामागे (कित्येक प्रकाशवर्ष) असलेल्या ताऱ्याच्या प्रकाशाचे वक्रीभवन होऊन तो ‘अदृश्य’ तारा निरीक्षकाला, शक्तीशाली दुर्बिणीतून दोन-चार प्रतिमांमध्ये किंवा ‘रिंग’सारख्या तेजस्वी गोलाकारात दिसतो. ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंगचा उल्लेख आइन्स्टाइन यांच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये (सर्वसाधारण सापेक्षवाद) पहिल्यांदा आला.

त्यामुळे अवकाशातील दूरस्थ वस्तूंच्या अस्तित्वाचे तसेच एकेका दूरस्थ ताऱ्याच्या मल्टिपल-इमेज (अनेक प्रतिमा) किंवा त्यांच्या प्रकाशाचे ‘कडे’ (रिंग) का दिसते याचा उलगडा झाला. आता स्पेसमध्ये गेलेल्या दुर्बिणीमुळे खूपच वेगाने अशा दूरस्थ म्हणजेच विश्वनिर्मितीनंतरच्या नजीकच्या काळात जन्माला आलेल्या तारकासृष्टीचा वेध घेणे सोपे झाले.

अवकाशातील हे मानवनिर्मित ‘डोळे’ जितके शक्तीशाली होतील तितकंच आपल्याला आपल्या विश्वाचे विराट अंतरंग समजायला मदत होईल. निदान अवकाशी ‘डोळे’ तरी प्रामाणिकपणे उघडे राहून सारे विश्व नीट न्याहाळतायत आणि आपल्याला आपल्याच आदिम अस्तित्वाची नव्याने जाणीव करून देतायत, ही केवढी आनंदायी गोष्ट आहे!

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article