देवगड : प्रचारसभेत बोलताना आदित्य ठाकरे. (छाया : वैभव केळकर)
Published on
:
18 Nov 2024, 1:00 am
Updated on
:
18 Nov 2024, 1:00 am
देवगड ः आमचे हिंदुत्व हे घरातील चूल पेटविणारे तर भाजपाचे हिंदुत्व हे घर पेटविणारे, असा घणाघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केला. भाजपाला सर्व अदानीच्या घशात घालायचे आहे. भाजपाचे खरे मुख्यमंत्री हे अदानीच असून, हे बदलण्यासाठी परिवर्तन आवश्यक आहे. भाजपाने महाराष्ट्र अंधारात नेला. त्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी, परिवर्तनासाठी मशाल पेटवावीच लागेल, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी देवगड येथे प्रचारसभेत केले. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ देवगड सारस्वत बँकेसमोरील पटांगणात आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, शिवसेना नेते गौरीशंकर खोत, सतीश सावंत, परशुराम उपरकर, अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताह्मणकर, स्वप्नील धुरी, शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, अॅड.प्रसाद करंदीकर, युवा सेना तालुका प्रमुख गणेश गावकर, फरीद काझी, महिला संघटक हर्षा ठाकूर, सायली घाडीगावकर आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपाने मुंबईमधील 1080 एकर जमीन अदानीला दिली. महाराष्ट्राला अदानीच्या तावडीतून वाचवायचे असेल तर परिवर्तन आवश्यक आहे. संदेश पारकर हे धडपडणारे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. आता आमिषे दाखिवले जातील मात्र लढायचे आहे त्यामुळे कुणालाही घाबरू नका. अंगावर आला तर शिंगावर घ्या, असे ते म्हणाले.(Maharashtra assembly poll)
भाजपाने 2014 पासून फसव्या योजना आणल्या. पहिली योजना 15 लाख देण्याची होती. त्यांनतर लाडकी बहीण योजना ही महिलांना महिना 1500 रुपये देणारी योजना आणली. पुन्हा भाजपा सत्तेत आल्यास 1500 मधील दोन शून्य काढून केवळ 15 रुपये देण्याची योजना आणतील. यामुळे फसव्या भाजपापासून सावध राहा. ‘एक है तो सेफ है’ असा नारा पंतप्रधान मोदी देतात मात्र ‘एक है तो सेफ है, भाजपसे दोन हात दुर रहे तो सब सेफ है’ असे सांगत परिवर्तनाची मशाल पेटवून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे यांच्यावरही टीका केली.
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर देवगडचा प्रसिध्द असलेल्या हापूस आंब्यासाठी जागतिक पातळीवर मार्केट उपलब्ध करून देण्याचा तसेच शेतकर्यांना फसव्या विमा कंपन्यांबाबतही पुनर्विचार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. लाडक्या बहिणींबरोबरच सुरक्षित बहिणींसाठी शक्ती कायदा आणणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी राणेंवर टीका केली. सिंधुदूर्गमधील जनतेने गेली 35 वर्षे यांना सत्ता दिली,अनेक पदे दिली परंतू यांनी स्वत:चा विकास केला. सर्व लाभ राणे कुटूंबीयांना मिळाला. याची चीड जनतेमध्ये आहे. यांनी विकास केला असता तर गावागावात पैसे का वाटता? विकासावर मते मागा, असे आव्हान पारकर यांनी दिले. सभेपूर्वी जामसंडे ते देवगड अशी बाईक रॅली काढण्यात आली.(Maharashtra assembly poll)