बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलन केले जात आहे. त्यातच भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीनचिट दिली आहे. धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे” असे विधान भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले. यासोबतच संतोष देशमुखांच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी भगवानगड उचलायला तयार आहे, असेही नामदेव शास्त्रींनी सांगितले. आता यावर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय देशमुख यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भगवान गड कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलायला तयार आहे, याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. आम्हाला भगवानगडाची मदत नको, न्याय पाहिजे, असे धनंजय देशमुख म्हणाले.
आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे
“या प्रकरणातील आरोपी फरार करण्यात ज्यांचा ज्यांचा संबंध आहे, त्यांना कुणी कुणी पैसे पाठवले. या सर्व गुन्हेगारीला बळ देणाऱ्या ज्या कुणी व्यक्ती आहेत त्यांचे नावे घोषित करावेत. गुन्हेगारांना फरार करताना मदत केली. अशा व्यक्तींचीही नावे घोषित करावीत. फेसबुक पोस्टच्या कमेंटमध्ये धमकी येतात त्या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना काल पुरावे दिलेले आहेत. त्यात एक दोन दिवसांमध्ये कारवाई होईल. गेल्या 53 दिवसांपासून तपास योग्य दिशेने होत आहे. त्याचा रिझल्ट असा आला पाहिजे की आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आमचे हीच मागणी आहे की आम्हाला यात न्याय मिळायला पाहिजे”, असे धनंजय देशमुख म्हणाले.
“आरोपींना एक चापट मारली. एवढ्या पुरतच नामदेव महाराज शास्त्री यांना सांगितले आहे. शिष्टमंडळ आणि गावकरी आम्ही सगळे भगवान गडावर जाणार आहोत. गेल्या 28 मे पासून आतापर्यंत काय काय घडलं, खंडणी कशाप्रकारे मागितली, खून कसा झाला, संतोष देशमुख यांच्यावर कुठले गुन्हे आहेत का, हे पण आम्ही त्यांना दाखवणार आहोत आणि आम्ही त्यांच्याकडून अपेक्षित उत्तर घेणार आहोत”, असेही धनंजय देशमुखांनी म्हटले.
नामदेव शास्त्री तेव्हा काय उत्तर देतात हे पाहणं गरजेचे
“संतोष देशमुख कुटुंबावर काय आघात झालेले आहेत या 53 दिवसांमध्ये सगळ्या राज्यभरातून संप्रदाय सामाजिक क्षेत्रातील सगळे लोक इथे आलेले आहेत. ते प्रत्यक्ष संतोष अण्णा देशमुख यांचं गाव, त्यांचं काम यावर प्रतिक्रिया दिली आहे. मरताना तो माझ्या कुटुंबासाठी मला जिवंत ठेवा असं न बोलता माझ्या गावासाठी जिवंत ठेवा असं बोलला. यातून त्याला त्याचं गाव किती महत्त्वाचं होतं, त्यात ही भावना महत्त्वाची आहे. गेल्या 53 दिवसात ज्यांनी कोणी बघितले नाही, त्यांना हे समजणं शक्य नाही. जे कुणी इथे आले त्यांना घाव समजलेला आहे. त्यामुळे नामदेव शास्त्री यांना हे सगळं समजल्यावर आरोपी आणि संतोष अण्णाविषयी त्यांचे काय उत्तर येते, हे बघणं आमची जबाबदारी आहे”, असे धनंजय देशमुख म्हणाले.
“मदतीची गरज माझ्या गावांनी पूर्ण केली”
“एक थेंब रक्त सांगितले की त्यांना वाईट वाटलं. पण संतोष देशमुख यांचे कृकर्त्यांनी हाल केले, त्यांच्या गाडीवर फोटो कोणाचे होते, ज्या ऑफिसमध्ये बसायचे तिथे कुणाचे फोटो होते, हे सगळा क्रम ही सगळी गोष्ट आम्ही नामदेव शास्त्री महाराजांना दाखवणार आहोत. त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. गेल्या 53 दिवसांपासून आमच्या कुटुंबाच्या शैक्षणिक सामाजिक या सर्व गरजा राजकीय/ सांप्रदायिक,सामाजिक यांनी ह्या गोष्टी उचल्ल्या आहेत. त्यामुळे आता आम्हाला ती गरज नाही. न्यायाची गरज आहे. मदतीची गरज माझ्या गावांनी आणि इतरांनी पूर्ण केलेली आहे”, असेही धनंजय देशमुखांनी ठणकावून सांगितले.
“आमच्या कुटुंबाला सावरण्याचे बळ मिळावं यासाठी प्रार्थना करणार”
“गावकरी आज गडाशी संपर्क करणार आहेत ते तिथे आहेत की नाही, जरी नसले तरी गडावर जाऊन भगवान बाबा चा आशीर्वाद घेऊन आमच्या कुटुंबाला सावरण्याचे बळ मिळावा यासाठी प्रार्थना करणार आहोत”, असेही धनंजय देशमुख म्हणाले.