भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांची भेट होणार आहे.File Photo
Published on
:
15 Nov 2024, 3:21 pm
Updated on
:
15 Nov 2024, 3:21 pm
नवी दिल्ली : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री डोंग जून यांची भेट होणार आहे. गेल्या महिन्यात पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांनी माघार घेतल्यानंतर आणि भारताने गेल्या आठवड्यात डेपसांग भागात पुन्हा गस्त सुरू केल्यानंतर ही पहिलीच मंत्रीस्तरीय बैठक असेल. २० नोव्हेंबरपासून लाओसमध्ये सुरू होणाऱ्या दोन दिवसीय १० देशांच्या आसियान शिखर परिषदेच्या दरम्यान दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एप्रिल २०२३ नंतर दोन्ही देशांचे संरक्षण मंत्री प्रथमच भेटणार आहेत. एप्रिल २०२३ मध्ये, चीनचे मंत्री ली शांगफू शांघाय शिखर परिषदेसाठी दिल्लीत आले होते. दोन्ही देशांकडून एकमेकांवर विश्वास प्रस्थापित करण्यासाठी या बैठकीकडे पाहिले जात आहे.
पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग भेटीनंतर संबंध सुधारू लागले
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे शी जिनपिंग यांच्या गेल्या महिन्यात रशियात झालेल्या बैठकीनंतर उच्चस्तरीय बैठकीच्या मालिकेतील ही दुसरी बैठक आहे. यातील प्रत्येक बैठकीकडे भारत-चीन संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून पाहिले जाईल. पुढील पावले काय असतील किंवा त्यानंतर संरक्षण मंत्र्यांमध्ये उच्चस्तरीय बैठका होतील की नाही हे स्पष्ट नाही. दोन्ही बाजू सैन्याला २०२० पूर्वीच्या स्थितीत परत येऊ देतील का? अनेक वर्षांनंतर दोन्ही सैन्याने दिवाळीत मिठाईची देवाणघेवाण केली आहे.